येरे येरे पावसा’चे सूर हरपले, डोंबिवलीत मराठी शाळा पडल्या ओस!

June 16, 2016 10:04 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे-ढोके, डोंबिवली

16 जून :  मराठमोळी संस्कृती जपणारं शहर अशी ओळख असणार्‍या डोंबिवलीमध्येच मराठी शाळांना ‘वाईट दिवस’ आले आहेत. कमी होत जाणारी पटसंख्या वाढवण्यासाठी शाळा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, पण चित्र काहीच बदलत नाही.

pic-school-Sharada-Sadan-2014-small

ये रे ये रे पावसा… तुला देतो पैसा… मराठी शाळांमध्ये ऐकू येणारा हा मराठी किलबिलाट आता हरवत चालला आहे. ‘ये रे पावसा…’च्या जागी ‘रेन रेन गो अवे…’ ने घेतली आहे आणि सगळ्याच पालकांची पावलं मराठी मध्यामांकडून इंग्रजी माध्यामांकडे वळली आहेत. मराठी शाळांचं माहेरघर असणार्‍या डोंबिवलीमध्येच जवळपास 40 मराठी शाळा आहेत आणि गेल्या 5 वर्षांत शाळेत भरती होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घसरत चालली आहे.

यावर्षी डोंबिवलीच्या मराठी शाळांच्या शिक्षकांनी वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांना मराठी माध्यमाच्या शाळांची महती पटवून देण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर या शाळांना बाहेर जाहिरातींचे बोर्ड लावावे लागले. मराठी शाळेत शिकण्यानंही मुलांचा विकास होतो हे सांगण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो लावण्यात आले.

मातृभाषेतून दिलेलं शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनात कायमचं राहतं, असं कितीतरी वेळा ठासून सांगितलं जातं. पण स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी माय मराठीपेक्षा इंग्रजीच बरी, असा मतप्रवाह रूढ होत चाललाय. मराठी शाळा ओस पडत चालल्यायत.. वर्गातले अबकडचे तक्ते गुंडाळावे लागलेत आणि जवळच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जॉनी जॉनी चे सूर घुमायला लागले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close