गुलबर्ग हत्याकांड प्रकरणाचा 14 वर्षांनंतर फैसला, 11 जणांना जन्मठेप

June 17, 2016 12:27 PM0 commentsViews:

17 जून : अखेर 14 वर्षांनंतर गुलबर्ग सोसायटी जळीत हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागलाय. आज (शुक्रवारी) अहमदाबाद हायकोर्टाने आपला निकाल देत हत्याकांडात दोषी ठरलेल्या 24 जणांपैकी एकालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. 24 पैकी हत्येचा आरोप असणार्‍या आणि दोषी ठरलेल्या 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये तर इतर 12 जणांना 7 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आणि दोषी ठरलेल्या एकाला 10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.gulbarg

गोंध्रा हत्याकांडानंतर देशभरात एकच हाहाकार उडाला होता. 28 फेब्रुवारी 2002 मध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीत काही समाजकंटकांनी 69 लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. या प्रकरणाची तब्बल 14 वर्षं कोर्टात सुनावणी सुरू होती. अहमदाबाद हायकोर्टाने याच महिन्यात 02 जून रोजी पुराव्याअभावी 36 जणांची निर्दोष मुक्तता केलीये. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे नगरसेवक पार्षद विपिन यांचाही समावेश आहे.

आज कोर्टाने या प्रकरणावर आपला अंतिम निर्णय दिलाय. 24 पैकी हत्येचा आरोप असणार्‍या आणि दोषी ठरलेल्या 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये तर इतर 12 जणांना 7 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दोषी ठरलेल्या एकाला 10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी एकाही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली नाहीये.

जळीत हत्याकांडात 69 लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. मात्र, त्यापैकी 39 जणांचे मृतदेह सापडले होते पण उर्वरित 30 जणांचे मृतदेह सापडले नव्हते. जे मृतदेह सापडले नाही अशा लोकांना न्यायालयीन भाषेत सातवर्षांनंतर मृत समजण्यात आलं. कोर्टाच्या या निर्णयावर एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी समाधानी नसल्याची प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या भीषण हत्याकांडात हाच कोर्टाने निर्णय दिलाय का ? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थिती केलाय. या प्रकरणी लढा देणार्‍या तिस्ता सेटलवाड यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं पण आरोपींना कमी शिक्षा देण्यावर नाराजीही व्यक्त केली. ज्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा दिली नाही त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी यासाठी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं सांगितलं.

काय आहे हे प्रकरण ?

2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेस अग्निकांडात 59 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीमध्ये संतप्त जमावाने 69 लोकांना जिवंत जाळलं होतं. या हत्याकांडात काँग्रेसचे नेते एहसान जाफरी यांचाही समावेश होता. या प्रकरणी एयआयटीने 73 लोकांना अटक केली होती. या प्रकरणाची वेगवेगळ्या तपास यंत्रणेकडून तपास कऱण्यात आला. अखेरीस सुप्रीम कोर्टाच्या नजरेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीकडे गुजरातमधील 9 प्रकरण सोपवण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close