भारतीय हवाई दलाचा नवा इतिहास; अवनी, भावना, मोहना बनल्या फायटर पायलट

June 18, 2016 2:02 PM0 commentsViews:

18 जून :   भारतीय हवाई दलाच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तीन महिला पहिल्यांदाच फायटर पायलट्स म्हणून सेवेत दाखल होऊन इतिहास घडवला आहे. फ्लाईंग कॅडेट भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तिघी आज रितसर हवाई दलाच्या महिला फायटर पायलट्स बनण्याचा मान मिळवला आहे.

iaf-women-2-94_647_030916084302

भारतीय वायुदलात प्रथमच महिला फायटर प्लेन पायलट सहभागी झाल्या आहेत. भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तीन तरुणींची पहिली तुकडी हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून दाखल झाले आहेत. पासिंग आऊट परेडनंतर या तिनही रणरागीणींना हा मान मिळाला आहे.

भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरुप रहा यांनी महिलादिनी म्हणजेच 8 मार्च रोजी महिला पायलट्स सहभागासंबंधीची घोषणा केली होती. त्याचीच पूर्तता आता झाली आहे. या तिघींनीही 150 तास विमान चालवण्याचा निकषही पूर्ण केला आहे. त्यानंतर त्या फ्लाईंग ऑफिसर म्हणून सेवेत दाखल झाल्यानंतर ऍडव्हान्स्ड जेट फायटरचं सहा महिन्यांचं प्रशिक्षण त्यांना पूर्ण करावं लागणार आहे.

कोण आहेत या तीन फायटर पायलट ?

अवनी चतुर्वेदी

  • मध्य प्रदेशच्या रीवाची रहिवासी, वडील एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर तर भाऊ लष्करात
  • बनस्थळी विद्यापीठातून कम्प्युटर सायन्सची पदवी

भावना कांत

  • बिहारमधल्या बेसुराची रहिवासी
  • बेंगळुरूतल्या एमएस महाविद्यालयातून बीई इलेक्ट्रिकल

मोहना सिंग

  • राजस्थानच्या झुंझनू जिल्ह्यातली रहिवासी
  • नवी दिल्लीच्या एअरफोर्स स्कूलमध्ये शिक्षण
  • वडील भारतीय वायू सेनेत कार्यरत

मुलींचं हे यश पाहून आई – वडिलांची छाती अभिमानाने फुली होती.

भारतीय वायूदलात महिला फायटर पायलट सामिल करण्याचा प्रस्ताव बर्‍याच काळापासून प्रलंबित होता. महिला फायटर पायलट झाल्यानंतर तिन्ही दलांमध्ये फ्रंट लाईनवर महिला असणारे वायुदल पहिलेच दल ठरणार आहे. सध्या वायुदलात 1500 महिला कर्मचारी आहेत. त्यात 94 पायलट आणि 14 नेव्हिगेटर आहेत. भारतीय सुरक्षा दलानं महिलांना प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानावर उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेनंतर महिलांच्या युद्ध मैदानातील सक्रीय सहभागाचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नौदल आणि लष्करातही महिलांना अशी संधी मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा