आम्ही थापा मारत नाही तर करून दाखवतो- उद्धव ठाकरे

June 18, 2016 5:50 PM0 commentsViews:

uddhav on MeatBan

18 जून : आम्ही फक्त थापा मारत नाही, कामं करून दाखवतो. शिवजलक्रांती ही योजना त्याचेच उदाहरण आहे, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. ते आज (शनिवारी) उस्मानाबादमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेचं यश पाहण्यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आहेत. दुष्काळी भागात पाण्याच्या संवर्धनसाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार आणि शिवजलक्रांती या दोन योजनांवरून सेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आम्ही थापा मारत नाही तर करून दाखवतो, असा भाजपला टोला लगावला आहे.

तसंच यावेळी त्यांनी महाबीज बियाण्यांच्या मुद्द्यावरूनही सरकारला लक्ष्य केलं. राज्य बियाणं महामंडळाने बियाण्यांची केलेली दरवाढ मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रद्द केली होती. मात्र, शेतकर्‍यांनी बियाणांची अगोदरच खरेदी केल्यामुळे आता दरवाढ रद्द करून काहीच उपयोग नसल्याचे उद्धव यांनी म्हटलं. याबाबतीत सरकारचे धोरण चुकल्याची टीका उद्धव यांनी केली. त्यामुळे आता भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close