वेडीवाकडी युती करणार नाही, उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा

June 19, 2016 8:32 PM0 commentsViews:

मुंबई – 19 जून : आगामी महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही माहित नाही पण लाचारीने युती करणार नाही आणि वेडीवाकडी युती मुळीच करणार नाही. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही तयार राहा असा शिवसैनिकांना आदेश देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. शिवसेना संपते कशी असे अनेक वेळापर्यंत झालेत पण सेना संपवणारे फक्त लाटेतच फडफडतात असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तसंच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टआम्हाला सल्ले देऊ नका, आम्ही आमचं पाहून घेऊ’ अशा स्पष्ट शब्दात सुनावलंय.uddhav_thackery_sppech

मुंबईतील गोरेगाव येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडली. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणल्या गेल्यामुळे संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांचा रोख भाजपवर होता. भाषणाच्या सुरुवातीलाच ‘बाहेरच्या विरोधकांपेक्षा, आपलेच जास्त विरोधक झालेत’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. गेल्या 50 वर्षांत अनेक चढउतार पाहिले. हे 50 वर्षं कसे निघून गेले हे कळलंच नाही. पण, शिवसेना सतत पुढेच जातेय. आज महाराष्ट्र भगव्या रंगाने न्हाऊन निघालाय. शिवरायाचे विचार घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची उभारणी केली. पण आज शिवरायांचा इतिहास ऐकून नुसतं थंड बसायचं का ? असा प्रश्न पडतोय. बाहेरच्या विरोधकांपेक्षा, आपलेच जास्त विरोधक झालेत आहे. सेना जेव्हा सुरू झाली तेव्हा शिवसेना गुंडांचा पक्ष म्हणून टीका झाली. पण आम्ही गुंडगिरी केली असती तर सेना 50 वर्षं टिकली नसती. शिवसेना नुसती टिकली नाही तर आम्ही जनतेची कामं करून दाखवलीये असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.

‘आम्ही रिजनल पण ओरिजनल’

शिवसेना संपते कशी असे अनेक वेळापर्यंत झालेत. पण शिवसेनेला संपवणारे फक्त लाटेतच फडफडतात. लाटेवर ओंडके तरंगतात, लाट वाहून गेल्यावर मात्र दगड-गोटे दिसायला लागते असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी लाटेचा उल्लेख न करता भाजपला लगावला. तसंच अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली. पश्चिम बंगालच्या लोकांनी दिल्लीश्वरांना नमवलं. आम्हालाही रिजनल म्हणून संबोधलं जातं पण आम्ही रिजनल जरी असलो तरी ओरिजनल आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

 

‘तेव्हा कुठे होते भाजपचे नेते’

बाबरी मशिद पाडली गेली. त्यानंतर देशभरात हाहाकार उडाला होता. मला आठवतं त्यावेळी ही बाबरी पाडण्याची बातमी आली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला होता. पलीकडच्या व्यक्तीने त्यातील काही लोकंही शिवसैनिक असल्याचं सांगितलं होतं. यावर बाळासाहेब म्हणाले होते ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्यानंतर दंगली उसळल्या. मुंबईतही 1993मध्ये दंगली भडकल्या होत्या. त्यावेळी मुंबई शांत करणे अशक्य झालं होतं. फक्त शिवसैनिकांनी मुंबई शांत केली. आता जे स्वत:ला सिंह म्हणून घेता त्यावेळी ही लोकं कुठे होती ?, राम मंदिर, समान कायदा अशी आश्वासनं देणारी तेव्हा कुठे होती. जर जबाबदारी घेत नाहीत ते नेते कसले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजपला उत्तर प्रदेशमधल्या कैरोनामध्ये भाजपला हिंदूंचं स्थलांतर का रोखता येत नाही ?, राम मंदिर, समान नागरी कायदा या घोषणांचं काय झालं ? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

‘शरद पवारांनी सल्ले देऊ नये’

नालायकांसोबत युती करू नका असा सल्ला शरद पवार देतात. मान्य आहे शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे पण
शरद पवारांनी आम्हाला सल्ले देऊ नये भाजप आणि आम्ही आमचं पाहुन घेऊ अशा स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी पवारांना सुनावलं.

‘वेडीवाकडी युती करणार नाही’

हिंदूंची मतं फुटू नये म्हणून आम्ही इतर राज्यात लढलो नाही. राज्यात सत्तांतर झालं पण हिंदूचं राज्य येईल म्हणून युती केली. जर
विधानसभेच्या वेळी थोडा वेळ मिळाला असता तर चित्र उलटवून दाखवलं असतं. पण आता शिवसेनेची भविष्यात एकहाती सत्ता आणून दाखवेन. विधानसभेच्या वेळी युती तोडली गेली. सर्व विसरून आम्ही सत्तेत सहभागी झालो. पण आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलं. येणार्‍या महापालिकेच्या निवडणुकीत युती होईल की नाही माहिती नाही. पण, निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही तयार राहा. आपल्याला युती तोडायची इच्छा नाही. पण लाचारीने युती करणार नाही. स्वाभिमानाने युती करेन वेडीवाकडी युती करणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुकले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा