राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय ?,भाजपचं ‘मनोगत’मधून टीकास्त्र

June 21, 2016 9:14 PM0 commentsViews:

21 जून : शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मधून होणा-या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं आता मनोगत या पाक्षिकाच्या माध्यमातून तितक्याच जोरदारपणे उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. राऊत साहेब, आता तलाक कधी घेणार ? अशी टीका माधव भंडारी यांनी मनोगतच्या लेखातून केलीये.

madhav_bhandari_rautसामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतीच केंद्रातील भाजपा सरकारची निजामाच्या बापाशी तुलना केली होती. या टीकेने पुरते घायाळ झालेल्या भाजपाने मनोगत या पक्षाच्या पाक्षिकामधून संजय राऊत यांच्या वर हल्ला चढविला आहे. टीका बास झाली, राऊत साहेब आता तलाक कधी घेता असा सवाल या पाक्षिकामधून राऊत यांना विचारण्यात आला आहे.

तसंच मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेचं यश राऊत यांना दिसत नाही का ?, एकीकडे निजामाच्या बापाने दिलेल्या ताटावर बसायचे, याच सत्तेच्या ताटातल्या निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा, बिर्याणीचं मिशीला लागलेलं तूप पुसत हात धुवायचे आणि यजमानाच्या नावाने बोट मोडायची ही कुठली ‘सच्चाई’ आहे हे राऊत यांनी जनतेला सांगावे असं आव्हानचं करण्यात आलंय.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी सविस्तर लेख लिहून शिवसेनेला जाहीर आव्हान दिले आहे. एकूणच मुंबई, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सामना मधून होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाला मनोगत मासिकाच्या माध्यमातून चांगलेच हत्यार सापडले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा