स्पेशल रिपोर्ट : ‘उडता महाराष्ट्र’, राजधानी झालीये नशेचा अड्डा !

June 21, 2016 9:23 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई – 21 जून : मुंबईत ड्रग्जचा काळा धंदा मोठ्या प्रमाणात फोफावलाय. मुंबईत वेगवेगळ्या मार्गानं अंमली पदार्थ येतात आणि ते तरुणाईपर्यंत पोहचतातही… हा धंदा असाच सुरू राहिल्यास उडता पंजाबप्रमाणे, राज्याची उडता महाराष्ट्र अशी ओळख होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

मुंबईवर प्रेम करणार्‍या मुंबईकरांनो ही आहे मुंबईची नवी ओळख…नशेची राजधानी… मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांचा धंदा होतो. मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर ड्रग्ज विकलं जातंय. उच्चभ्रू वस्तीतले तरुण या नशेच्या जाळ्यात अडकत चाललेल. गांजा, चरस, हेरॉईन, एमडी ड्रग्जची नशा केली जाऊ लागलीये. गेल्या दोन वर्षांत एनसीबीनं मुंबई परिसरातून 35 कोटींचं ड्रग्ज पकडलंय. अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंटची आकडेवारी तर आणखी वेगळी आहे. पाकव्याप्त काश्मीर, नेपाळमधून मोठ्या प्रमामात ड्रग्ज मुंबईत आणले जातात.udta_maharashtra

मुंबईत वेगवेगळ्या मार्गानं अंमली पदार्थ आणले जातात. कार्गो शिप्स, रेल्वे आणि रस्त्यांच्या मार्गातून हे ड्रग्ज सहज मुंबईत आणले जातात. रोज रेल्वेनं हजारो प्रवासी मुंबईत येतात. या प्रवाशांची झडती घेणं आणि प्रत्येकावर लक्ष ठेवणं हे सुरक्षा यंत्रणांसाठी सोपी गोष्ट नाही. हीच बाब कार्गो शिप्सची आहे. दररोज हजारो कंटेनरची आणि त्यातल्या मालाची तपासणी करणं म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखं आहे.

सरकारी यंत्रणांनी ड्रग्ज माफियांविरोधात जशी कठोर कारवाई सुरू केली तशी त्यांनी आपली मोडस ऑपरेंडीही बदलली. माफिया काश्मीरमधून ड्रग्ज घेऊन रस्त्यांमार्गे दिल्लीत येतात. तिथून ते ट्रेननं दिल्ली ते जयपूर असा प्रवास करतात. जयपूरमधून ट्रॅव्हल्सच्या बसमधून ते मुंबईत दाखल होतात. पक्की माहिती मिळाल्याशिवाय अशी लोकं पकडताच येत नाहीत.

ड्रग्जचे रोज नवेनवे प्रकार बाजारात येतायेत. त्यामुळे सरकारी यंत्रणांकडून होणार्‍या कारवाईवर मर्यादा येतात. जर ड्रग्ज माफियांची नांगी वेळीच ठेचली नाही तर उडता पंजाब सिनेमातली स्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळणार अशी भीती व्यक्त केली जातेय.

अशी होते ड्रग्जची वाहतूक
काश्मीरमधून ड्रग्ज रस्त्यामार्गे दिल्लीत
दिल्लीतून ट्रेननं ड्रग्ज जयपुरात आणतात
जयपूरमधून खासगी वाहनाने मुंबईत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा