इस्रोचा ‘भीमपराक्रम’, एकाच वेळी केले 20 उपग्रहांचे प्रक्षेपण

June 22, 2016 1:19 PM0 commentsViews:

22 जून : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने आज भीमपराक्रम गाजवलाय. पीएसएलव्ही सी 34 या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी तब्बल 20 उपग्रह अंतराळ कक्षेत यशस्वीपणे सोडलेत. यामध्ये अमेरीका, कॅनडा, जर्मनी आणि इंडोनेशीया या देशांच्या 17 उपग्रहांचा समावेश आहे.

isro_44अनेक प्रतिकुल परिस्थितीवर मात करत, इस्त्रोने आज तब्बल 20 उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले. अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिलाच देश ठरलाय. ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या सर्वात विश्वासू पीएसएलव्ही या प्रक्षेपक यानाद्वारे इस्त्रोने सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी केली. अशी कामगिरी याआधी अमेरीकेच्या प्रसिद्ध ‘नासा’ या अंतराळ संस्थेनेही केलेली नाही. यामध्ये परदेशी अतंराळ संस्थेचे एकूण 17 उपग्रह, नियंत्रीत भूस्थिर कक्षेत सोडले आहेत.

17 विदेशी उपग्रह कोणते आहेत ?
1)SKYSAT GEN 2.1 अमेरिका
2) अमेरिकेचे 3 QUAD पॅकेज आहेत ज्यामध्ये 12 DOVE उपग्रह आहेत.
3)LAPAN A3 इंडोनेशिया
4)M3MSAT कॅनडा
5)GHGSat-D कॅनडा
6)BIROS जर्मनी

याशिवाय तीन भारतीय उपग्रहांचाही समावेश आहे.

1)पुणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला
स्वयम् उपग्रह
2) चेन्नईच्या सत्यभामा विश्व विद्यालय
3) इस्रोचा कार्टोग्राफिक उपग्रह

पीएसएलव्ही यानाचं हे सलग 35 वं यशस्वी उड्डाण होतं. उड्डाण केल्यानंतर परदेशी आणि भारतीय उपग्रहांना त्यांच्या निर्धारीत कक्षेत यशस्वीपणे सोडल्यानंतर, सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावर शास्त्रज्ञांनी आनंद साजरा केला. भारताच्या या यशस्वी मोहिमेने अंतराळ व्यापार क्षेत्रात, भारतीय शास्त्रज्ञांबद्दलचा विश्वास अधीक वाढलांय. एवढंच नाही तर इस्त्रो जगात सर्वाधिक स्वस्तदरात उपग्रह सोडणारी संस्था ठरलीये. त्यामुळे जगभरातील गरजू देशांसाठी भारत हा मोठी गुंतवणूक करणारा देश ठरलाय. पीएसएलव्ही यानाने एकाचवेळी 20 उपग्रह अवकाशात पाठवण्याची योजना, भारताला अवकाश विज्ञानातील महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे.

या प्रक्षेपणाबाबत आणखी काही माहिती..

- उपग्रहांचं एकूण वजन : 1,288 किलो
– पीएसएलव्हीचं हे 35वं उड्डाण
– आतापर्यंत इस्रोकडून 57 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण
– 2008 : इस्रोनं केलं 10 उपग्रहांचं प्रक्षेपण
– 2013 : नासानं केलं 29 उपग्रहांचं प्रक्षेपण
– 2014 : रशियाकडून 33 उपग्रहांचं प्रक्षेपण
– पण परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण करणारा भारत पहिला देश

“एका दमात 20 उपग्रह! या मोठ्या यशासाठी आपल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन. इतर देशांच्या अंतराळ धोरणात त्यांना मदत करण्याची क्षमता आपण विकसित केली आहे. मी मोठ्या अभिमानानं हे प्रक्षेपण टीव्हीवर बघत होतो. ” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा