महसूल अधिकार्‍यांना संरक्षण देण्याचे आश्वासन

April 2, 2010 1:39 PM0 commentsViews: 2

विनोद तळेकर, मुंबई2 एप्रिलराज्यातल्या महसूल खात्याच्या अधिकार्‍यांना निडर आणि निप:क्षपातीपणे काम करता यावे यासाठी आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. स्वत: महसूलमंत्री नारायण राणेंनी तसे आश्वासन दिले आहे. दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबईत डेप्युटी कलेक्टर सुमंत भांगे यांना मारहाण करण्यात आली होती. त्यासोबतच राज्याच्या इतर भागातही गेल्या काही महिन्यांपासून वाळू माफिया किंवा लँडमाफियांकडून सरकारी अधिकार्‍यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शुक्रवारी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात तहसिलदार राज्यव्यापी अधिवेशनादरम्यान हा विषय चर्चेला आला. या अधिकार्‍यांना येणार्‍या अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात तहसिलदार संघटनेतर्फे काही मागण्यांचे पत्रक महसूलमंत्र्यांना देण्यात आले.या अधिवेशनात पगाराबाबत, रिक्त पदांबाबत, अधिकारक्षेत्राबाबत, तसेच पुरेशा निधीबाबतच्या मागण्यांवर निश्चितच विचार केला जाईल, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले. तसेच गेल्या काही दिवसातील महसूल खात्याच्या अधिकार्‍यांना मारहाणीच्या घटना पाहता त्यांना सुरक्षा देण्याची महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली. तहसिलदारांच्या मागण्या मान्य करतानाच राणेंनी तहसिलदारांना कानपिचक्याही दिल्या. नुसता पगाराबद्दलच विचार करू नका तर कामाच्या दर्जातही सुधारणा झाली पाहिजे, असेही राणेंनी सुनावले.

close