…आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात, पवारांचं टीकास्त्र

June 26, 2016 3:23 PM0 commentsViews:

कोल्हापूर – 26 जून : आधी छत्रपती पेशवांची नेमणूक करायचे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे. आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मात्र, याबरोबरच आम्ही या नेमणुकीकडे राजकीयदृष्टीनं बघत नाही असंही पवार म्हणाले. पवार यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झालीये.pawar_on_cm3

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेची झोड उठवलीय. इतिहासाचा दाखला देत पवार यांनी यापूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत होते आणि पेशव्यांकडून फडणवीसांची नियुक्ती केली जात होती. मात्र आता संभाजीराजेंच्या बाबतीत फडणवीसांनीच छत्रपतींची नियुक्ती केल्याचा प्रकार घडला असून आपण असं कधी पाहिलं नव्हतं असंही म्हटलंय. तसंच शिवसेना आणि भाजपमध्ये कितीही वाद झाला तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, असं भाकितही शरद पवार यांनी वर्तवलय. भाजपाकडून करण्यात येणार्‍या जाहिरातबाजीवर हल्ला चढवताना, आता कुठे नेवून ठेवलाय देश माझा ? असं म्हणण्याची वेळ या सरकारने जनतेवर आणली आहे असा टोलाही पवारांनी लगावला.

तसंच पवारांनी भाजप सरकारच्या धोरणांचे वाभाडेही काढले. भाजपाची लाट ओसरत असून आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती येईल. असा दावा करतानाच जनतेच्या मुळ प्रश्नांकडे बगल देवून लोकांचे लक्ष विचलीत करण्याची कला भाजपने अवगत केल्याचा घणाघातही पवार यांनी केला. तर छगन भुजबळांच्या प्रश्नावर अधिक बोलण्याच टाळत त्यांनी भुजबळ लवकरच बाहेर येतील आणि ते नव्या जोमाने पक्ष वाढीच्या कामाला लागतील असा विश्वास व्यक्त केला. तर पुण्यातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी महापौरांचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापलं नसल्यानंही पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.अशा कार्यक्रमांसाठी नियमाप्रमाणे लोकप्रतिनिधींना बोलावण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. मात्र सरकारने एवढंही सौजन्य दाखवलं नाही, हे दुर्देवं असल्याचंही पवार यांनी म्हटलंय.

दरम्यान, राज्यसभेवर संभाजीराजांची नियुक्ती मी केलेली नाही, ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केलीये, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा