…तर शिंगावर घेऊ, सेनेचा शेलारांवर पलटवार

June 26, 2016 7:30 PM0 commentsViews:

मुंबई – 26 जून : शिवसेना आणि भाजपमध्ये ‘शोले’ राडा शांत होण्याची चिन्ह असताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जाळपोळीसाठी तयार राहा अशा इशारा देत शिवसेनेला पुन्हा डिवचलं. त्याला शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं. अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.

sena_vs_bjpजर शिवसेना आमचे साहित्य आणि पुतळे जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या आणि पुतळ्यांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला होता. तसंच विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणार्‍यांना जनता लोकशाही बाहेर ठेवेल असं म्हणत पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्‍या शिवसेनेला टोला सुद्धा शेलारांनी लगावला.

विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करू नये असा आदेश काढला होता. पण आज आशिष शेलारांनी जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा देऊन यात आणखी भर घातली. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी शिवराळ भाषेत शेलारांवर टीका केली. आणि अंगावर आले तर शिंगावर घेऊ अशा इशारा दिला. याआधीही पेडणेकर यांनी माधव भांडारींवर टीका करत अमित शहा यांना गब्बरची उपमा दिली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा