एड्सग्रस्त मुलांसाठी सेवालय चालवणार्‍या रवी बापटलेंना मारहाण

June 27, 2016 4:16 PM0 commentsViews:

लातूर – 27 जून : लातूर जिल्ह्यातल्या हासेगाव येथे एड्स बाधित विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी पुढाकार घेत सेवालय सुरू करणार्‍या रवी बापटले यांच्यासह चार एड्स बाधित विद्यार्थ्यांना गावातल्या सरपंच महिलेच्या पतीकडून मारहाण केल्याची घटना समोर आलीय. या सेवालयातले विद्यार्थी वृक्षारोपण करीत होते. याला गावातल्या महिला सरपंचाचा पती आणि त्यांच्या मुलांनी विरोध केला. या विरोधातून ही हाणामारी झाल्याचं सांगण्यात येतंय. या हाणामारीत चार विद्यार्थी जखमी झालेत.ravi baptle

औसा तालुक्यातल्या हासेगाव येथे एड्स बाधीत मुलांच्या संगोपनासाठी गेल्या आठ वर्षांपासून सेवालय नावाची संस्था काम करतेय विविध ठिकाणावरील एड्स बाधित लहान मुलं या ठिकाणी आश्रयाला आहेत. मात्र, गावातल्या सरपंचाच्या पतीचा या प्रकल्पाला नेहमीच विरोध आहे. त्यामुळं सेवालय सुरू झाल्यापासूनच सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांना असंख्य संकटांना सामोरं जावं लागलं. आजही या ना त्या कारणावरून सेवालयाला विरोध सुरूच आहे.

आज सकाळी सेवाल्याच्या जागेत वृक्ष लागवड करताना अचानक सरपंच महिलेचा पती भीमाशंकर बावगे आणि त्यांची दोन मुलं त्या जागेवर आली आणि विद्यार्थी आणि रवी बापटले यांना धमकावायला सुरुवात केली या बाबतीचं चित्रीकरण करण्यासाठी मोबाईल काढला असता अचानक भीमाशंकर बावगे आणि दोन मुलांनी हल्ला चढवत चार एड्स बाधित मुलांना जखमी केले.

त्यापैकी दोन मुलांचे डोके फुटले तर रवी बापटले आणि अन्य दोघांना जबर मुक्का मार लागलाय. कायमच सेवालयाला विरोध असल्यानं हा हल्ला करण्यात आल्याचं रवी बापटले आणि विद्यार्थी सांगतात तर या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रार अर्ज आली असून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा