तुषार कपूर लग्नाआधीच झाला बाप !

June 27, 2016 6:40 PM0 commentsViews:

मुंबई – 27 जून : अभिनेता तुषार कपूर लग्नापुर्वीचं बाप झालाय.. ऐकून नक्कीच आश्चर्य वाटण्यासारखं आहे…आयव्हीएफ टेक्नॉलॉजी आणि सरोगसी मदरच्या साहाय्याने तो एका मुलाचा बाप बनला आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलाचा जन्म झाला. तुषारनं त्याच्या मुलाचं नाव ‘लक्ष्य’ ठेवलं असून, कपूर कुटुंबातील ते पहिले नातवंड आहे. लक्ष्य आता घरी आला असून त्याची प्रकृती उत्तम आहे.

अभिनेता तुषार कपूरने सरोगसी करून मुलाला जन्म देण्याचा घेतलेला निर्णय अनेकांच्या भुवया उंचावून गेला..कारण अशा पद्धतीने मुलाला जन्म देऊन एकट्याने त्याचं पालनपोषण करणारा बॉलिवूडमधला तो पहिलाच अभिनेता ठरलाय. वडिल जितेंद्र आणि आई शोभा कपूर आणि बहिण एकता कपूरने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर त्याने या मुलाला जन्म घालून आपल्या हिंमतीवर त्याला वाढवण्याचा निर्णय घेतलाय.मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मदतीने त्याने हे शक्य करून दाखवलं.tushar_kapoor

तसं पहायला गेलं तर बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार्सनी मुलांना जन्म देण्यासाठी सरोगसीचा मार्ग निवडला. यात सगळ्यात पहिलं नाव होतं ते अर्थात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचं…किरण रावसोबत दुसरं लग्न केल्यानंतर किरणला प्रेग्नन्सीमध्ये अनेक प्रॉब्लेम येणार होते. त्यामुळे आमिरने किरणच्या तब्येतीला महत्त्व देत सरोगसी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आमिर आणि किरण यांनी सरोगसी करून एका मुलाला जन्माला घातलं. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावावरून त्याचं नाव आझाद असं ठेवण्यात आलं. आमिर आणि किरण हे दोघे मिळून आज त्याला मोठ्या हौसेनं वाढवतायत.

त्यानंतर काही वर्षातच शाहरूख खान आणि गौरी खाननेही सरोगसीचा मार्ग निवडला. शाहरूख आणि गौरी यांना आर्यन आणि सुहाना अशी दोन मुलं असतांनाही सरोगसी करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांच्या नात्यात येत असलेला दुरावा दूर करण्यासाठी आणि पुन्हा एकदा पालकत्व स्विकारून एकमेकांच्या जवळ येण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली. शाहरूखने हा निर्णय घेतला तेंव्हा आर्यन 16 वर्षांचा तर सुहाना ही 13 वर्षांची होती. मात्र तरीही त्यांनी सरोगसी करून मुलाला जन्म दिला. शाहरूखच्या या मुलाचं नाव अबराम असं ठेवण्यात आलं. अबरामच्या येण्यानं शाहरूखच्या जगण्याला नवी दिशा मिळाली. अनेकदा तो अबरामला स्वतःसोबत घेऊन फिरताना किंवा त्याच्या संगोपनात रमलेला दिसला.

याशिवाय सलमान खानच्या घरातही सरोगसी करून एक खास मेंबर आला. तो म्हणजे सोहैल खानचा दुसरा मुलगा योहान…सोहैल आणि त्याची पत्नी सीमा सचदेव यांना निर्वान हा मुलगा होता.मात्र तरीही दुसर्‍या मुलाला जन्म देताना पत्नीच्या तब्येतीला त्रास होऊ नये यासाठी सोहैलने सरोगसी करून घेण्याचा निर्णय घेतला. सध्या सोहैल आपल्या या दोन्ही मुलांचं मनापासून संगोपन करतोय.

बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही हा ट्रेंड तसा फार आधीपासून प्रचलीत आहे. अभिनेत्री निकोल किडमन आणि जेसिका पारकर, अभिनेता रॉबर्ट डी निरो, गायक रिक्की मार्टीन आणि फूटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो पॉप स्टार मायकल जॅक्सन यांनीही सरोगसी करून मुलांना जन्म दिलाय. आपल्या मुलांसोबत उर्वरित आयुष्य अतिशय आनंदाने हे सेलिब्रिटीज आज घालवतायत.

सुश्मिता सेन, संदीप सोपारकर या सेलिब्रिटीजनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचं पालकत्त्व स्विकारलं होतं. तेंव्हा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला होता. त्यांनी मोठ्या हिंमतीने सिंगल पॅरंट बनून आपल्या मुलांना वाढवलं.मात्र, आता तुषारच्या या निर्णयामुळे सरोगसी करून स्वतःच्या मुलाला वाढवण्याचा नवा ट्रेंडही रूजू पहातोय. येत्या काही दिवसात अशा एकट्या माता पित्यांची संख्या वाढलेली दिसली तर नवल वाटायला नको.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा