स्पेशल रिपोर्ट : सेना-भाजपचं तुझं माझं जमेना…

June 27, 2016 8:11 PM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई, 27 जून : शिवसेना – भाजपमधील सत्तासंघर्षाची लढाई आता मुदद्यावरून गुदद्यावर आली आहे. सेना-भाजपच्या मुखपत्रांमधील शाब्दिक बाणांनी शिवसैनिकांप्रमाणेच भाजप कार्येकर्ते देखील पुरते घायाळ झाले आहेत. वाघ-सिंहांमधील आढावा घेणारा हा रिपोर्ट…uddhav-on-fadnavis

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेनं आजपर्यंत विरोधकांना पुरते घायाळ केले. मात्र गेल्या 2 वर्षांत शिवसेनेचे हे वाग्बाण मित्रपक्ष असलेल्या भाजपवर बरसू लागले आणि कलह सुरू झाला. केंद्रात आणि राज्यात भाजपबरोबर सत्तेत असून देखील सामनाची आणि एकूणच शिवसेनेची भूमिका सरकारविरोधी राहिली. याला उत्तर म्हणून भाजपने आपलं मुखपत्र असलेल्या मनोगत या पाक्षिकात शिवसेनेला सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला.

याच दरम्यान माधव भांडारी यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना शोले मधील असरानी यांच्याशी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले. राज्यात धुळे-नंदुरबार या भागात माधव भांडारी यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. तर नांदेडमध्ये भाजपा नेत्यांच्या गाड्या फोडल्या. मुंबईमध्येही शिवसैनिक भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.

शिवसैनिक अशा पद्धतीनं संतप्त झालेला असतानाच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. भाजप कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेला जशास तसे उत्तर द्यावं असं आवाहन केल्याने सेना-भाजपमध्ये यापुढील काळात देखील रस्त्यावरची लढाई होऊ शकते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत ‘सामना’मधून कोणतीही टीका केली तरी भाजपकडून शिवसेनेला कधीच प्रत्युत्तर दिलं जात नसे. मात्र एकहाती सत्तेत आलेल्या भाजपनं शिवसेनाप्रमुखांनंतर वेळोवेळी शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न केलाय. सामना विरुद्ध मनोगत हा सेना-भाजपमधील वादाचा पहिला अंक असला तरी खरी लढाई मुंबई महापालिका निवडणुकी दरम्यान होणार आहे. थोडक्यात मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षासाठी शिवसेना-भाजप नेते म्यानातून तलवार काढून सज्ज झालेत हेच दिसून येतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा