माझ्याविरोधात कटात पक्षातील विरोधक सहभागी-खडसे

June 29, 2016 9:41 PM0 commentsViews:

जळगाव – 29 जून : माझ्यावरचा आरोप हा एक कटाचा भाग आहे. पक्षातील विरोधकांचा यामध्ये सहभाग आहे. जर मी बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. तसंच पक्षातील गद्दारांना जागा दाखवा असा आदेशही त्यांनी आपल्या समर्थकांना दिला. यावेळी त्यांनी युती जर तुटली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता अशी ग्वाहीही दिली.eknath_khadse3

अनेक आरोपांमुळे मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे आज पहिल्यांदाच जळगावातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चांगलेच गरजले. सेना भाजपातील कलगीतुरा राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत असली तरी आजच्या खडसेंच्या या बैठकीत पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला. भाजपातीलच मंत्रीच त्यांच्या विरोधी कारवायांमध्ये कसे सक्रीय होते याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. त्याचप्रमाणे आपल्यावर मीडिया ट्रायल झाल्याचं देखील आवर्जून सांगितलं. एकंदरित मंत्रिपद गेल्यानंतही आपली पक्षनिष्ठा आणि आपली प्रतिमा किती चांगली आहे, हेच मांडण्याच काम खडसे यांनी कार्यकर्त्यांसमोर केलं.

शिवसेना विरोधात बोलायला नेहमी खडसे अग्रेसर आहे. यावेळी त्यांनी युती तुटली म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला. नाहीतर युती तुटली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता असा खुलासाही खडसेंनी केला.

आपल्यावर होत असलेल्या घराणेशाही संदर्भातील आरोपांवर त्यांनी आज भाष्य केलं. यात माझ्याच घरात सर्व पदे कशासाठी याचा खुलासा देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु,आपल्याच पक्षातील एक नेता माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करतो, असं सांगत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा देखील खडसेंनी चांगलाच समाचार घेतला. एकंदरीत यामुळे पक्षांतर्गत असलेलं राजकारण चव्हाट्यावर आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा