‘वाघा’चं चालणं हे दोन्ही पक्षांवर अवलंबून -उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

June 30, 2016 7:07 PM0 commentsViews:

मुंबई, 30 जून : शिवसेना आणि भाजपमध्ये ‘शोले’ राड्यानंतर भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वृक्षारोपण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. यावेळी आम्ही 25 वर्षांपासून सोबत आहोत, सर्व प्रश्न सामोपचारानं सोडवू अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. तर
ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाही त्यावर आम्ही बोलूच, शेवटी युतीतला वाघ चालेल की नाही हे दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.uddhav_mungantiwar_meet

भाजप आणि शिवसेनेमधला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीचं औपचारिक कारण वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणं असलं तरी मुख्य भर दोन्ही पक्षांच्या संबंधांवर होता. यावेळी मीडियाशी बोलतांना दोन्ही नेत्यांनी संयमांनीच उत्तरं दिली.

युतीतला वाद मिटेल की नाही हे मला माहित नाही. ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाही त्यावर आम्ही बोलूच अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. तसंच आदित्य ठाकरे यांनी जी भूमिका घेऊन सरकारला सांगण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याच्या नाईट लाईफच्या संकल्पनेची अनेकांनी थट्टा केली होती. त्यावेळेस राज्य सरकारनं ती भूमिका मानली नाही मात्र, आज केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घेतलाय. मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वाघ वाढलेच पाहिजे -उद्धव ठाकरे

या भेटीत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाघाचा प्रतिकात्मक पुतळा भेट दिला. यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत वक्तव्य केलं. बर्‍याचं वर्षांनी ज्यांना पर्यावरणाबद्दल खरंच आस्था आहे असे वनमंत्री लाभले आहे. सुधीर भाऊंनी वाघ भेट दिलाय. वाघ वाढवण्यासाठी आमची चर्चा झाली. वाघांची संख्या ही वाढली पाहिजे. राज्यातलेच नाही तर देशातले वाघ वाढले पाहिजेत यावर मुनगंटीवार आणि माझं एकमत आहे. आता युतीतला वाघ चालेल की नाही हे दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे असं सूचक वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केलं.

सर्व प्रश्न सामोपचारानं सोडवू -मुनगंटीवार

तर आमची भेटही राजकीय नव्हती. पण, उद्धव ठाकरेंनी वृक्षारोपण कार्यक्रमाचं निमंत्रण स्विकारलं आहे. आता युतीतलं पर्यावरण टिकवण्यासाठी चर्चा झाली तरी त्याची चर्चा माध्यमांमध्ये करणार नाही. आम्ही 25 वर्षांपासून सोबत आहोत, सर्व प्रश्न सामोपचारानं सोडवू अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. तसंच 10 जुलैच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तर होईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या आधीच विस्तार होईल असं सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना मंत्रिमंडळ विस्ताराची आठवणही करून दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा