युतीला उद्धव ठाकरे आणि माझं खतपाणी, मुख्यमंत्र्यांनी आळवला मैत्रीचा सूर

July 1, 2016 2:12 PM0 commentsViews:

मुंबई – 01 जुलै : “उद्धव ठाकरेंनी झाडं लावलं आम्ही दोघांनी खतपाणी घातलं. या वृक्षाचा वटवृक्ष होईल” असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीतल्या ‘शोले’ला मुठमाती देण्याचा प्रयत्न केला. तर कोणत्याची चांगल्या उपक्रमाला अपशकून करणार नाही असं सांगत चांगल्या कामात शिवसैनिक सरकारबरोबर असतील अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

uddhav_cmराज्य सरकारच्या दोन कोटी वृक्षारोपण चळवळीच्या निमित्तानं युतीतला तणाव कमी होताना दिसतोय. माहीमच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात वृक्षारोपण सोहळ्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या मोहिमेचं तोंडभरुन कौतुक केलं. कोणत्याची चांगल्या उपक्रमाला अपशकून करणार नाही असं सांगत चांगल्या कामात शिवसैनिक सरकारबरोबर असतील अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनीही युतीत दिलजमाई झाल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी झाडं लावलं आम्ही दोघांनी खतपाणी घातलं. यावृक्षाचा वटवृक्ष होईल असं सांगत. याचा योग्य तो संदेश गेला असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. या निमित्तानं का होईना गेल्या काही दिवसांपासून शिवसेना- भाजपमधील तणाव निवळताना दिसला. तर आतापर्यंत राज्य सरकारनं 33 लाख झाडं लावल्याचा दावा यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.

या वृक्षारोपण सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. पुढील तीन वर्षांत राज्यभरात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प सरकारचा आहे. या वृक्ष लागवडीत विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. सरकार प्रत्येक गावात ‘रोप वाटीका’ तयार करणार आहे. या हरीत चळवळीत सरकारमधील सर्व विभाग सहभागी झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा