सियाचीनमध्ये जवानाचं सुरक्षा कवचच कमकुवत ?

July 1, 2016 6:25 PM0 commentsViews:

दिल्ली, 01 जुलै : सियाचीन..जगातली सर्वात उंच, अतिशय दुर्दम्य अशी रणभूमी..गेल्या दोन दशकात भारतीय लष्करानं याठिकाणी आपले हजारच्या वर जवान गमावलेत..तेही शत्रूशी लढताना नाही तर खराब हवामानाचा सामना करताना…पण आपले जवान ज्या परिस्थितीत तिथे सामना करता त्यांच्या संरक्षणासाठी देण्यात आलेल्या स्नो सूटमध्येच भ्रष्टाचार झाल्याची बाब आता समोर आलीये. सियाचीनमधल्या जवानांच्या स्नो सूटच्या व्यवहारात कसा भ्रष्टाचार झाला हे एका श्रीलंकन कंपनीच्या माजी कर्मचार्‍याने सगळ्यांच्या समोर आणलंय. या व्हिसलब्लोअरने याबदद्ल संरक्षण मंत्रालयाला आणि पंतप्रधान कार्यालयाला वारंवार पत्रं लिहिली. पण याबद्दल कुणीही काहीच कारवाई केली नाही.india_siachen indian army

उंची तब्बल 5 हजार 400 मीटर..उणे पन्नास अंश सेल्सिअसपर्यंत जाणारं तापमान..जिथं चिटपाखरूचाही लवलेश नाही. तिथं सामान्य अवस्थेत माणसाला तग धरणं केवळ अशक्य..या जीवघेण्या वातावरणात टिकण्यासाठी खास बनवलेले कपडेच वापरावे लागतात..याचवर्षी हिमस्खलनामुळे नऊ जवान शहीद झाले होते..लान्स नाईक हणुमंताप्पानं मृत्यूशी सहा दिवस झुंज देत अखेर हॉस्पिटलमध्ये प्राण सोडले.

अशा अमानवी वातावरणात राहणार्‍या जवानांना चांगले, दर्जेदार कपडे मिळत असतील, असं आपल्याला वाटेल. पण वास्तव मात्र हेलावून टाकणार आहे. सीएनएन न्यूज 18 नं गेल्या दोन महिन्यांत केलेल्या तपासात धक्कादायक गोष्टी उघड झाल्यात. प्रत्येक क्षणाला मृत्यूशी सामना करणार्‍या सियाचीनमधल्या आपल्या शूर जवानांना निकृष्ट दर्जाचे कपडे देण्यात येतात. हे धक्कादायक असलं तरी सत्य आहे. सीएनएन न्यूज 18 नं अथक प्रयत्नानं मिळवलेली ही पत्रं, ई मेल्स, अहवाल पाहिल्यानंतर आपलं रक्त उसळेल.

siachinहे सगळं सुरू होतं एका पत्रापासून…हे पत्र आहे.. 24 ऑगस्ट 2015 चं. रेनवेअर नावाच्या एका श्रीलंकेमधल्या कंपनीच्या माजी कर्मचार्‍याने हे पत्र लिहिलंय. युनायटेड किंगडममधल्या आर्डमेल ग्रुपची ही कंपनी आहे. या कंपनीला 2012 मध्ये 3 अस्तरांच्या स्नो सूटचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. याबद्दलचं पत्र संरक्षण मंत्रालयातल्या सगळ्या उच्चाधिकार्‍यांना पाठवण्यात आलं.

या पत्रात स्पष्ट आरोप आहे.श्रीलंकेमधल्या रेनवेअर कंपनीने भारत सरकारची 20 लाख डॉलर्सला फसवणूक केलीय. या पत्रातला पाचवा परिच्छेद बघा…

“हिरव्या कापडाचं दुसरं अस्तर हे अजिबात वार्‍यापासून आणि पाण्यापासून संरक्षण करणारं नाहीये. जॅकेट्स आणि पँट्सच्या आत पाणी जाऊ शकतं आणि जवानांना थंडी वाजू शकते. हे स्नो सूट युरोपमधल्या 15 डिग्रीमध्येच तगू शकतात. युरोपमध्ये याच कंपनीने वेगळ्या प्रकारचे स्नो सूट पुरवलेत.”

या स्नो सूटच्या दर्जामध्ये इतकी तडजोड केली असेल तर आपण आपल्या जवानांच्या जीवाशी खेळतोय.

siachin3या पत्रात असंही म्हटंलय की, “या स्नो सूटच्या चाचणीच्या वेळी वेगळं साहित्य दाखवण्यात आलं होतं. जेव्हा कंपनी या कॉन्ट्रॅक्टसाठी टेंडर भरत होती. तेव्हा स्नो सूटसाठी वेगळं साहित्य वापरण्यात आलं आणि कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर साहित्य बदलण्यात आलं.”

या सगळ्या गैरकारभाराबद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आवाज उठवला पण केंद्रात आलेल्या नव्या सरकारनेही यावर काहीच कारवाई केली नाही. याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्याने 28 डिसेंबर 2015 ला आणखी एक पत्र लिहिलं. कोलंबोमध्ये त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यानंतर त्याने भारताच्या उच्चायुक्तांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि याची चौकशी करण्याचं वचन दिलं पण या सगळ्याचं पुढे काहीच झालं नाही.

काही प्रश्न

- श्रीलंकेची कंपनी भारत सरकारला फसवतेय याबद्दल रेनवेअरच्या माजी कर्मचार्‍याने सांगूनही भारतीय उच्चायुक्तांनी यावर काहीच पाऊल का उचललं नाही ?
- संरक्षण मंत्रालयातल्या अधिकार्‍यांनी या पत्राची दखल का घेतली नाही ?
- या पत्रावर संरक्षण मंत्रालयाने काहीच कारवाई का केली नाही ?
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा