राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेना बहिष्कार टाकण्याच्या तयारीत ?

July 4, 2016 5:49 PM0 commentsViews:

04 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्यावर येऊन ठेपला आहे. पण या मंत्रिमंडळ विस्तारात एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेचा सहभाग नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलीये. रिक्त असलेलं केंद्रीय मंत्रिपद द्यावं असा सूर सेनेनं लगावला. अन्यथा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बहिष्कार टाकू असा इशारा शिवसेनेनं भाजपला दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

uddhav-fadanavis_newशिवसेना आणि भाजपमध्ये ‘शोले’ राड्यावरून चांगलाच ‘सामना’ रंगला होता. आता वाद शमला असला तरी धुसफूस अजूनही कायम आहे. राज्य मंत्रिमंडळाचे वारे वाहू लागले आहे. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण या मंत्रिमंडळ विस्तारात एनडीएचा घटक पक्ष शिवसेना सहभागी होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचं एक मंत्रिपद रिक्त आहे. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे पक्ष श्रेष्ठी अमित शहा यांच्यात अजून कोणतीही चर्चा झालेली नाही आहे. त्यामुळे केंद्रातील शिवसेना आणि भाजपचा समन्वय तुटला. उद्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना जर सहभागी झाली नाही. तर राज्यात होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना बहिष्कार घालण्याच्या तयारीत असल्याचं सुत्रांकडून समजतंय.

दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिवसेनेनं हट्ट धरल्याची सूत्रांची माहिती आहे. कॅबिनेट मंत्रिपद द्याल तरच मंत्रिमंडळ विस्तारात रस असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये याच संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहे. शिवसेनेनं घातलेल्या अटीमुळे भाजपची मात्र अडचण झालीये.

एवढंच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी दबावतंत्र सुरू केलंय. सत्तेसाठी आम्ही लाचार होणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी व्यक्त केलाय. एवढंच नाहीतर भीक नको, हक्काचं तेच घेणार, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे
शिवसेनेच्या दबावतंत्राला भाजप कसा प्रतिसाद देतो हे पाहण्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे भाजपच्या श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केलीये. त्यामुळे केंद्रात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं दिसून येतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा