‘रद्दी द्या…वह्या घ्या'; पुण्यातल्या आर्यभूषण प्रेसचा अनोखा उपक्रम

July 4, 2016 7:35 PM0 commentsViews:

अद्वैत मेहता, पुणे
04 जुलै : पुण्यातील आर्यभूषण प्रेसच्या रद्दी द्या आणि कोर्‍या करकरीत वह्या घ्या या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. या वह्या गरजू मुलांना देत असून पर्यावरणसंरक्षण, आणि समाजसेवेचं पुण्य पुणेकर पदरात पाडून घेत आहेत.

Pune Raddi

रद्दी तशी टाकाऊ गोष्ट. पण याच रद्दीचा पुणेकरांनी विधायक वापर केला आहे. आर्यभूषण प्रेसनं रद्दीच्या मोबदल्यात पुन:प्रक्रिया केलेल्या वह्या देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला पुणेकरांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जून महिन्यात 35 हजार किलो रद्दी गोळा झाली आहे. आणखी 15 दिवस हा उपक्रम चालणार आहे.

रद्दीच्या मोबदल्यात मिळालेल्या वह्या वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. या वह्यांच्या मुखपृष्ठावर ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची माहिती आहे. काही पुणेकर रद्दीच्या मोबदल्यात मिळालेल्या वह्या स्वत:च्या वापरासाठी ठेवतात. तर काही पुणेकरांनी या वह्या गरजू विद्यार्थ्यांना वाटण्याचा संकल्प केला आहे.

गेल्या वर्षी आर्यभूषण प्रेसमध्ये एक लाख किलो रद्दी गोळा झाली होती. त्यामोबदल्यात 70 हजार पुन:प्रक्रिया केलेल्या वह्या वाटण्यात आल्या होत्या. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी असा दुहेरी उद्देश पुणेकरांनी साध्य केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा