हक्काची भाषा करणारी शिवसेना 24 तासात मवाळ!

July 5, 2016 9:32 PM0 commentsViews:

05 जुलै : राजकारणात 24 तास किती मोठे असतात आणि ते किती क्लेशदायक असू शकतात हे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंना विचारायला हवं. कारण आहे मोदींचा मंत्रीमंडळ विस्तार. कालपर्यंत हक्काची भाषा करणार्‍या उद्धव ठाकरेंना शेवटी भाजपानं वाट पहायला लावल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि त्यांचं वक्तव्य नाराजी लपवू शकले नाही आहेत.

uddhav_thackery_sppech

मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या अगदी काही तास अगोदर उद्धव ठाकरेंची ही भाषा हक्काची होती.

शिवसेनेच्या वाघाची सध्या जी काही स्थिती आहे ती पहाण्यासारखी आहे. ‘सामना’तून डरकाळी फोडणार्‍या वाघाला भाजपानं मंत्रीपदासाठी मात्र वाट पहायला लावल्याचं दिसतं आहे. जोपर्यंत सन्मानानं मिळत नाही तोपर्यंत घेणार नाही म्हणणार्‍या उद्धव ठाकरेंची आजची भाषा मात्र एकदम एका ठिकय…हो…बघू अशी होती… त्यांची नाराजी त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होती.

केंद्रात मंत्रीमंडळाचा विस्तार होतोय. शिवसेनेला त्यात काहीही मिळालेलं नाही. शिवसेनेला आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती. मोदी- शहा त्यांची बोळवण राज्यमंत्रीपदावर करू पहात होते. शेवटी चर्चा वगैरे झाल्याच असणार पण उद्धव ठाकरेंना हवा असलेला सन्मान भाजपानं मात्र दिलाच नाही. शेवटी उद्धव ठाकरे मागणार्‍याच्या भूमिकेत किती काळ रहाणार हा सवाल आहे.

शिवसेनेचे म्हणून जे काही मित्रपक्ष दिसत होते त्यांनाही भाजपानं हायजॅक केलं आहे. रामदास आठवलेंना अगोदर राज्यसभा आणि त्यानंतर आता मंत्रीपद. राज्यातल्या दलित जनतेला जोडण्याचा हुकमी एक्का भाजपानं टाकला आहे आणि त्याला यश येताना दिसतंय. राज्यमंत्रीमंडळातही भाजपानं शेट्टी, मेटेंसाठी जागा सोडल्या आहेत. शेवटी उद्धव ठाकरेंकडे शुभेच्छा देण्याशिवाय काहीही राहीलेलं नाही.

दिल्लीनं उद्धवची अवस्था अवघड केली आहे. मंत्रीपदासाठी शिवसेना लाचार होताना दिसतेय. बरं ते मिळालं असतं तर तेही चाललं असतं. पण शिवसेनेच्या वाघानं ‘सामना’तून, प्रेस कॉन्फरन्समधून डरकाळ्या फोडायच्या आणि प्रत्यक्षात मात्र वेळ आली की शांत व्हायचं असंच सध्याचं चित्रं आहे.

एक वेळ होती बाळासाहेब सांगायचे आणि भाजपाचे सगळे ज्येष्ठ मंडळी मातोश्रीवर चकरा मारायचे. आता कदाचित दिवस पालटलेत आणि भाजपा त्याचा वचपा काढताना दिसतंय. आगामी राज्यमंत्री मंडळ विस्तारात तरी भाजपा शिवसेनेला सन्मानजनक खाती देणार का हे पहाणं औत्सुक्याचं आहे. आणि तसं नाही झालं तर शिवसेनेचा वाघ नेमकं काय करणार हेही महत्वाचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा