महाराष्ट्राच्या हाती देश! मोदी मंत्रिमंडळातील टॉपची खाती मराठी नेत्यांकडे

July 6, 2016 9:21 PM0 commentsViews:

06 जुलै : जो नेता धक्कातंत्र वापरत नाही त्याचं राजकारण प्रेडीक्टेबल होत जातं. महाराष्ट्रात शरद पवारांचं धक्कातंत्र कायम चर्चेचा विषय असतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपात जे काही निर्णय घेतलेत त्यानं विरोधकच नाहीत तर भाजपातलेही अचंबीत झालेत. विशेष म्हणजे ह्या धक्कातंत्रात महाराष्ट्राच्या नेत्यांना मात्र चांगले दिवस आलेत. स्मृती इराणींचा वाढता आवाज आता बंद होईल.

  • नितीन गडकरी, रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री
  • मनोहर पर्रिकर, संरक्षण मंत्री
  • प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकास मंत्री
  • सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री
  • पीयूष गोयल, ऊर्जा मंत्री

maharashtra cabinet

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळावर नजर टाकली तर त्यात महाराष्ट्र आणि मराठी माणसं ठळकपणे दिसतायत. फक्त मंत्रिमंडळच नाही तर खातेवाटपातही जवळपास महत्वाची आणि कामाची खाती मराठी माणसं सांभाळतायत. त्यातलं सर्वात महत्वाचं नाव आहे ते नितीन गडकरी.

नितीन गडकरी, दळणवळण मंत्री

गडकरी हे भाजपाचे थिंक टँक मानले जातात. ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा राहीलेत. संघाचे अत्यंत निकटवर्तीय. कदाचित पक्षात आणि त्याच वेळेस संघात स्वतःचं स्थान अबाधित राखणारे गडकरी हे एकमेव मंत्री आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातही गतीमान काम करणार्‍यांमध्ये गडकरी आघाडीवर आहेत. महामार्गांच्या बांधकामांबरोबरच त्यांनी जलवाहतुकीवरही भर दिलाय. रस्त्यांमधून देशाला जोडणारा मंत्री मराठी आहे.

मनोहर पर्रिकर, संरक्षण मंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री असणार्‍या मनोहर पर्रीकरांना अचानक दिल्लीत मंत्रिपद दिलं गेलं. आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या संरक्षण मंत्रालयाचा कारभार एका स्वच्छ नेत्याला देण्याचा सरकारचा विचार होता. त्यात सरकारनं पर्रीकरांसारख्या नेत्यांना संरक्षण खात्याची जबाबदारी दिली. पाकिस्तान, चीन या भारताच्या पारंपारिक शत्रुंना आपली ताकद दाखवण्यात पर्रीकर यशस्वी होताहेत. शेवटी हिमालयाच्या
मदतीला सह्याद्री असणं आवश्यक आहेच.

सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री

मूळ शिवसेनेच्या मुशीत तयार झालेले सुरेभ प्रभू यांची कार्यप्रणाली तशी भाजपला सूट होणारी. नेमकं त्यांच्या कामाची पद्धती हेरून मोदींनी त्यांना रेल्वेमंत्रीपदाचा भार सोपवला. लोकप्रिय घोषणा टाळत प्रभूंना अर्थसंकल्प मांडला. गडकरी रस्त्यांच्या माध्यमातून देश जोडताहेत, तर प्रभू रेल्वे जाळं उभारून देशाला धावायला लावताहेत. मुंबईच्या लोकलचा जो लोच्या झालाय, तो त्यांनी सोडवावा हीच मुंबईकरांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री

केंद्रात मंत्री होण्याची जावडेकरांची ही पहिलीच वेळ…सत्ता नसताना पक्षाचं प्रवक्तेपद सांभाळत त्यांनी पक्षाची जोरदार बाजू माध्यमांमध्ये मांडली. मंत्री बनल्यानंतर जावडेकरांना पर्यावरण खात्याची जबाबदारी मिळाली. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर त्यांनी खात्याच्या माध्यमातून देशाची भक्कम बाजू मांडली. त्या खात्यात केलेल्या कामाच्या मूल्यमापनावरच जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची लॉटरी लागली. स्मृती इराणीमुळं हे खातं बदनाम झालं होतं, आता जावडेकर किती यशस्वीपणे ही जबाबदारी पेलतात पाहावं लागणार आहे.

पीयुष गोयल, केंद्रीय ऊर्जा मंत्री

रेल्वे, रस्ते, संरक्षण आशी खाती मराठी नेत्यांकडे आलेली असतील तर त्यात आणखी एक महत्वाचं नाव आहे पीयुष गोयल. गोयल हे मुंबईकर. त्यांच्याकडे बघितलं तर एका पॉश अशा उद्योगपतीची इमेज आपल्यासमोर रहाते. पण पुन्हा त्यांनाही राज्यसभेतून मंत्रीमंडळात आणलं गेलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा भर ऊर्जा निर्मिती आणि ती गरिबांच्या घरापर्यंत कशी पोचेल यावर आहे. एलईडी, गरीबांना गॅस कनेक्शन किंवा सोलार ऊर्जा अशा वेगवेगळ्या योजना गावापर्यंत पोचतायत. त्याला यशस्वी करण्याचं श्रेय पीयुष गोयल ह्या मुंबईकर नेत्याकडं जातं.

मोदींच्या मंत्रीमंडळात शिवसेनेचे अनंत गीते, आता रामदास आठवले, सुभाष भामरे, हंसराज अहिर अशी आणखीही काही मराठी, महाराष्ट्रीयन नेते आहेत. त्यांच्याकडेही महत्वाची खाती आहेतच. पण देशाची टॉपचे खाते आज महाराष्ट्र सांभाळतोय. मोदींनी राजधर्म, शेजारधर्म पाळलेला दिसतोय. मराठी नेते तो विश्वास सार्थ ठरवतायत हेही महत्वाचं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा