सामान्य नागरिकांसाठी मुंबईचा चेहरामोहरा आता बदलणार – मुख्यमंत्री

July 6, 2016 10:56 PM0 commentsViews:

Mumbai BJP23

06 जुलै : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारामुळे मुंबईकरांची दुरावस्था झाल्याची टीका करत सामान्य नागरिकांसाठी मुंबईचा चेहरामोहरा आता बदलणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. सोबतच, 2017ची निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने कामाला लागा, असा आदेशही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात आशिष शेलार यांच्याकडे 2016 ते 2018 या कार्यकाळासाठी भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.

पालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होईल की नाही हे माहित नाही. मात्र कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष न देता निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागा, असं फडणवीस यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवरील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडल्यास पालिका निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकणार नाही असं, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसंच, भाजप सत्तेवर आल्यापासून पायाभूत वाहतूक आणि अन्य सुविधांचे जाळं निर्माण करून मुंबईकरांचे जीवन सुखकर करू, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावरून एकूण भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. सध्या शिवसेना आणि भाजपची युती टिकणार की तुटणार याच्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमात आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 2016-18 या कार्यकाळासाठी शेलार यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेशी दोन हात करण्याची जबाबदारी शेलार यांच्याकडेच असेल, हे देखील स्पष्ट झाले आहे. शेलार यांनी आपल्या भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख राक्षस असा केला. या राक्षसाला टीका करून मोठे करून नये. त्याऐवजी त्याला बाटलीत बंद करा, असा शेलार यांनी कार्यकर्त्यांना दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा