युतीत ‘महाभारत’, राक्षसाची उपमा दिल्यामुळे शिवसैनिकांनी शेलारांचा पुतळा जाळला

July 7, 2016 9:41 AM0 commentsViews:

07 जुलै : शिवसेना-भाजपमधील वादाचे शोले शांत होत नाहीत तोच आता युतीत महाभारताला सुरुवात झालीये. आशिष शेलारांनी सेनेला मायावी राक्षसाची उपमा दिल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी शेलारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.ashish_shelarvs_sena

काल षण्मुखानंद सभागृहात भाजपचा मेळावा पार पडला. यावेळी भाजप हा कुण्या एकाच्या मालकीचा पक्ष नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष तोफ डागली. तसंच भाजप मुंबई महापालिका निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि कमळाला 114 जागा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या सर्वच आमदार तसंच नेत्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाअगोदर नेत्यांची भाषणं झाली त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा नारा दिलाय. काहींनी तर भाजप मुंबईतल्या 114 जागा कशा जिंकू शकतं ह्याचं धोरणच जाहीर केलं. तोच स्वबळाचा राग मग मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेल्या आशिष शेलार यांनीही आळवला.

यावेळी आशिष शेलारांनी सेनेचं नाव न घेता त्यांना मायावी राक्षसाची उपमा दिली. शेलारांच्या या टीकेमुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी परळच्या कामगार मैदानात आशिष शेलारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. शिवाय शेलारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याआधी आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचलं होतं. तुम्ही आमचे पुतळे,पाक्षिकं जाळत असाल तर आम्हीही तुमचे वृत्तपत्र पुतळे जाळू असा इशारा शेलारांनी दिला होता. त्यावेळीही शिवसैनिकांनी शेलारांना शकुनीमामाची उपमा देत पुतळा जाळला होता.  आधीच युतीत ताणले गेलेले संबंध पाहता युतीत सुरू झालेले महाभारत आणखी पेटण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा