कोण आहे झाकिर नाईक ?

July 7, 2016 1:49 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई, 07 जुलै : बांग्लादेशची राजधानी ढाक्यात अतिरेक्यांनी 20 पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला. वीशीच्या आतबाहेर असलेल्या तरूण बांग्लादेशी पोरांनी एका पॉश कॅफेत प्रत्येकाचा धर्म विचारात त्यातल्या नागरिकांची हत्या केली. जे इस्लाम धर्माचे होते त्यांना सोडलं पण जे गैर इस्लामिक होते त्यांचं हत्याकांड केलं. या सगळ्या हत्याकांडाशी मुंबईचंही कनेक्शन उघड होतंय आणि हे कनेक्शन आहे इस्लामिक प्रचारक झाकिर नाईक.zhakir_naik

इस्लामवर कधी सौम्यपणे तर कधी आक्रमक तर कधी अतिशय वेगामध्ये बोलणारा हा माणूस आहे झाकिर नाईक. इस्लामचे अभ्यास करणारे, यूट्युबवर ऐकण्यासारखं वेगवेगळं खाद्य शोधणार्‍यांना झाकिर नाईक हे नाव नवं नाही. पण आता झाकिर नाईक चर्चेत आलेत ते ढाक्यातल्या अतिरेकी हल्ल्यामुळे. कारण इसिसच्या ज्या सहा अतिरेक्यांनी ढाक्यात हत्याकांड घडवलं त्यातले काही जण झाकिर नाईक यांची अशी भाषणं ऐकूण प्रभावित झाल्याचं उघड होतंय. अंजम चौधरी ह्या दुसर्‍या एका इस्लामिक प्रचारकालाही ह्या दहशतवाद्यांनी टीव्हीवर, सोशल मीडियावर फॉलो केल्याचं दिसतंय.

झाकिर नाईक हे मुळचे कोकणी मुसलमान. डोंगरी भागात त्यांची इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणारी संस्था आहे. पीस टीव्ही नावाचं चॅनलही ते चालवतात जे शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये चालतं. झाकिर नाईक यांचं हेच चॅनल बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. त्याच चॅनलवरचं नाईक यांची भाषणं ऐकूण अतिरेकी प्रभावित झाल्याचं समजतंय. आता झाकिर नाईक यांच्या चॅनलसह त्यांच्या विविध संस्थावर बंदी घालावी अशी मागणी केली जातेय.

झाकिर नाईक हे पेशानं डॉक्टर आहेत पण त्यांचं बोलणं प्रभावी आहे. ऐकणारे कुठल्याही धर्माचा असो ते नाईक यांना ऐकत राहातील. बरं ते हिंदीत फार कमी वेळेस उत्तरं देतात. त्यांची इंग्रजी टीपिकल पण प्रभावी आहे. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी, इस्लाम आणि हिंदू धर्म अशा वेगवेगळ्या धार्मिक विषयावर ते वाद विवाद करतात. त्यात मग इस्लाम धर्म इतरांपेक्षा कसा ग्रेट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यात अनेक वेळेस ते चुकीचेही संदर्भ देतात. ते सांगत असलेल्या इस्लामवर वाद होतात.

झाकिर नाईक यांची भाषा अनेक वेळेस कट्टर होते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांना इंग्लंड, अमेरिका, कॅनडात बंदी आहे. मुंबई, ठाण्यातही झाकिर नाईक यांनी पीस म्हणजेच शांतता परिषदा घेतल्यात. ते मुस्लिम मुलांसाठी विशेषत:हा गरीब घरातल्या मुलांसाठी शाळा, कॉलेजेस चालवतात. त्यांना स्कॉलरशीपही देतात. आता तेच नाईक हे एनआयएच्या रडारवर आहेत. आता त्यांच्यावर नेमकी कारवाई काय होणार हे पहाणं महत्वाचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा