भाजपची नावं पक्की, शिवसेनेचं सस्पेन्स कायम

July 7, 2016 5:12 PM0 commentsViews:

Mahayuti1

07 जुलै :  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारा पाठोपाठ आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होणार असून, यामध्ये भाजपकडून पांडुरंग फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शुक्रवारी सकाळी 9 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये 8 ते 9 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. यापैकी 4 जण भाजपचे, 3 जण मित्रपक्षांचे तर दोघे जण शिवसेनेचे असतील असंही सांगितलं जात आहे. कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे, याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, त्यामधील काही नावे निश्चित समजली जात आहेत.

भाजपमधून पांडुरंग फुंडकर यांचं नाव निश्चित मानले जात आहे. त्याचबरोबर डॉ संजय कुटे, मदन येरावार, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल, शिवाजीराव नाईक ही नावं जवळपास निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी एखाद्या नावातच बदल होऊ शकतो, असे सूत्रांनी म्हटलं आहे. तसंच ठाण्यातून रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. हरिभाऊ जावळेंच्या नावाचीही चर्चा जोरात आहे. तर मित्रपक्षातून सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे, शिवसेनातून गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तारात काय मिळणार, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेला दोन राज्यमंत्रीपदे देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. पण शिवसेनेकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाचीही मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य केली जाणार का, हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल. त्याचबरोबर मागणी मान्य न झाल्यास शिवसेना विस्तारामध्ये सहभागी होणार का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा