शपथविधीला गैरहजेरीचा वेगळा अर्थ काढू नका -उद्धव ठाकरे

July 8, 2016 2:57 PM0 commentsViews:

uDdhav thackray banner]मुंबई, 08 जुलै : शिवसेना वैयक्तिक स्वार्थासाठी कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. आम्ही काही सत्तेसाठी लाचार नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मागितलंच नव्हतं असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलंय. तसंच आपण शपथविधीला गैरहजर राहिलो याचा वेगळा अर्थ काढू नका असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा शपथविधी आज पार पडला. या विस्तारात शिवसेनेला दोन राज्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. सेनेनं कॅबिनेटपदाची मागणी केल्याचं बोललं जात होतं. एवढंच नाहीतर शपथविधी सोहळ्यालाही उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. विस्तारावर उद्धव ठाकरेंची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली होती. या सगळ्या वादावर खुद्द उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकलाय. शिवसेनेनं कॅबिनेट मंत्रिपद मागितलेलंच नव्हतं. त्यामुळे जे काही मिळालंय ते ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. सत्तेसाठी शिवसेना काही लाचार नाही. मी याआधीही हे सांगितलं होतं आणि आजही तेच सांगतो. जर असं काही असतं तर आम्ही केंद्रातलं मंत्रिपद स्विकारलं नसतं असा स्पष्ट खुलासा उद्धव ठाकरेंनी केला. तसंच शपथविधीला आज मी गैरहजर राहिलो याचा वेगळा अर्थ काढू नका असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं. आमच्यात जो काही वाद आहे तो चर्चेनं सोडवू, मुख्यमंत्री खातेवाटपाबाबत योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षाही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा