वरिष्ठ मंत्री खाते सोडेना, खातेवाटपासाठी मुख्यमंत्र्यांची दमछाक

July 9, 2016 8:23 PM0 commentsViews:

09 जुलै : राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आटोपला खरा पण 34 तास उलटूनही खातेवाटप करण्यात आलं नाही. वरीष्ठ मंत्री खाती सोडण्यास तयार नसल्यामुळे त्यांची खाती काढून घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच दमछाक होत आहे. तर आपल्याकडे कोणती खाती मिळेल याच्या प्रतिक्षेत नवनिर्वाचित मंत्री आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री रशिया दौर्‍यावर जाण्यापूर्वी खातेवाटप जाहीर करण्याची शक्यता आहे.cm_khatewatap

काल शुक्रवारी राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी पार पडला. 10 मंत्र्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे सहा तर तीन मित्रपक्ष आणि शिवसेनेच्या दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शक्यतो शपथविधी झाल्यानंतर काही तासांत खातेवाटप जाहीर केलं जातं. पण वरिष्ठ मंत्री आपल्या खात्यांवर अजूनही अडून बसल्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेलं जलसंधारण खातं सोडण्यास तयार नाही. जरी त्यांचं खातं काढलं तर ते जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

त्याच्याबरोबरच विनोद तावडेंही वैद्यकीय शिक्षण खातं सोडण्यास तयार नसल्याचं कळतंय. जर तावडेंकडून वैद्यकीय शिक्षण खातं काढलं तर गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकतं. तर महसूल खात्याची वर्णी लागलेले चंद्रकांत पाटील आपल्याकडील सहकार आणि पणन खातं सोडण्यास तयार आहे. सहकार खातं सुभाष देशमुख यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर कामगार खातं हे राम शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

तर कृषी खातं हे पाडूरंग फुंडकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौर्‍यावर निघण्यापूर्वी खातेवाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्याची अनेक ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुणाचे खाते कुणाला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

कुणाची खाती, कुणाला ?

पंकजा मुंडे- जलसंधारण सोडण्यास तयार नाही
विनोद तावडे -वैद्यकीय शिक्षण सोडायला तयार नाही
चंद्रकांतदादा पाटील- सहकार, पणन सोडणार
कृषी- पाडूरंग फुंडकर यांच्याकडे जाण्याची शक्यता
सहकार- सुभाष देशमुखांचं नाव निश्चित ?
कामगार- राम शिंदे यांना दिलं जाणार
जयकुमार रावल- पंकजाकडून काढलेलं जलसंधारण देणार का?
गिरीश महाजन- तावडेंचं वैद्यकीय शिक्षण मिळण्याची शक्यता


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा