राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस; ठिकठिकाणी नद्यांना पुर

July 10, 2016 4:02 PM0 commentsViews:

10 जुलै :  पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मुंबई आणि कोकणसह राज्यात चांगला पाऊस झाला आहे.

विदर्भात मुसळधार
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला असून मोबाईल सेवाही ठप्प झाली आहे. पर्लकोटा नदीच्या पुरामुळे 250 गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला या जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

rain inmaha

भामरागडमध्ये पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे पर्लकोटा नदीच्या पाण्यच्या पातळीत वाढ होत आहे. संपूर्ण भामरागड ताल्युक्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. अनेक गावांना बेटाचं स्वरुप आलेलं आहे. भामरागडचा वीज पुरवठा सलग तिसर्‍या दिवशीही बंद आहे. मोबाईल सेवाही पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान एट्टपल्ली तालुक्यातल्या बांडे नदीला आलेल्या पुरामुळे पन्नास पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलेला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोठारी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेलीये. या कारमधील चार जण बेपत्ता झालेत. या चौघांचा शोध सुरू आहे. कोठारी ते येनबोडी गावादरम्यानच्या किन्ही पुलावर ही घटना घडलीये. बेपत्ता चार जणांपैकी तिघेजण शिक्षक असल्याचं सांगण्यात येतंय. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

मुळा नदीला पूर
अहमदनगर जिल्ह्यात मुळा नदिला पूर आल्यामुळे पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. नदीवरील मांडवे पूल पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अकोले तालुक्यातही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे परिसरात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

नाशिकमध्ये विक्रमी पाऊस

नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नाशिकसह इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील काही भाग जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा