पंकजा मुंडेंच्या नाराजीला मुख्यमंत्र्यांचे ट्विटरवरून उत्तर

July 10, 2016 2:09 PM0 commentsViews:

10 जुलै :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खातं राम शिंदे यांच्याकडे तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे वैद्यकीय शिक्षण खाते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये जलसंधारण खाते काढल्याने पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून उघडपणे नाराजी व्यक्त होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उत्तर (रिप्लाय दिला) देत सिंगापूरमध्ये होणार्‍या परिषदेला सरकारचे प्रतिनिधी म्हणून हजर राहण्यास सांगितलं.

fadnavismunde-1468154787

‘सिंगापूरमध्ये होणार्‍या वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित रहाण्याचं मला निमंत्रण मिळालं होतं. पण आता मी त्या खात्याची मंत्री राहिली नसल्याने उपस्थित राहू शकणार नाही असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं होतं. पंकजा मुंडेच्या या ट्विटला ‘तुम्ही वरिष्ठमंत्री या नात्याने सरकारच्या प्रतिनिधी म्हणून वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहीले पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या या पक्षांतर्गंतं संघर्षाता शेवट काय होतेय माहीत नाही पण सध्यातरी फडवणीस यांना मुख्यमंत्रीपदाची आस बाळगणार्‍या पक्षांतर्गंत प्रतिस्पर्ध्यांना पुरतं गारद करून टाकलं आहे. आधी एकनाथ खडसेंनी घरी बसवलं आणि आता पकंजा मुंडे आणि विनोद तावडेंचं खातेवाटपात पंख छाटलेत. तसंच चंद्रकात पाटलांनाही 2 नंबरचं महसूल खातं देऊन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवारांना तिसर्‍या क्रमांकावर पाठवलं आहे. पण सध्याच्या राजकीय स्थितीत मुख्यमंत्री सर्वात वरचढ ठरले असले तरी त्यांना लो प्रोफाईल वाटणार्‍या चंद्रकांत पाटलांचं अमित शहा कनेक्शन विसरून चालणार नाही. सध्यातरी मुख्यमंत्री आपल्या फडणवीस नीतीच्या जोरावर आपली स्थान अधिक बळकट करून कमालीचे यशस्वी ठरलेत असंच म्हणावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा