काश्मीरमधील हिंसाचारात एका पोलिसासह 19 ठार, 200 जखमी

July 10, 2016 9:48 PM0 commentsViews:

jammu34221

10 जुलै :  हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वानी शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मिरात सुरू झालेला हिंसक आंदोलनाचा आगडोंब अजूनही कायम आहे. काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. तर अनंतनाग जिल्ह्यामध्ये संतप्त आंदोलकांनी पोलिसांची व्हॅन झेलम नदीमध्ये ढकल्यमुळे या हिंसक आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले आहे. यामध्ये एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे.

बुरहान वानी प्रकरणानंतर सुरू झालेल्या आंदोलनात जमावाला आवरण्यासाठी सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत 16 जण ठार झाले आहेत. कश्मीर खोर्‍यातील हे आंदोलन पसरू नये म्हणून खोर्‍यातील मोबाइल इंटरनेट सेवा कालपासूनच खंडित करण्यात आली आहे. तर आज सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनात पोलिसाच्या मृत्यूसह आणखी तीन आंदोलक ठार झाले आहेत. पोलिसांनी हिंसक जमामावर ताबा मिळवण्यासाठी केलेल्या गोळीबारात आणखी तीन तरूणांचा मृत्यू झाला आहे. या कारवाईनंतर या हिंसक आंदोलनात आपला जीव गमावलेल्यांची संख्या 19 वर पोहोचली असून तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शेकडो पोलिसांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिजबुल मुजाहिद्दीनच्या बुरहान वानीसह इतर दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केलं होतं. त्यानंतर काही नागरिकांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी पोलीस ठाण्यासह सरकारी कार्यालये आणि लष्कराच्या जवानांना लक्ष्य केले आहे. कायदा व सुव्यवस्थाची स्थिती लक्षात घेऊन राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा