सहकाराने दिली समृद्धी

April 6, 2010 3:40 PM0 commentsViews: 12

अद्वैत मेहता, अमेय तिरोडकरसहकाराने महाराष्ट्राच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिले आहे. 'बिना सहकार नाही उद्धार' म्हणत देशात सहकाराच्या चळवळीने एक आदर्श उभा केला.'हा साखर कारखाना म्हणजे साखर तयार करून निव्वळ नफा मिळवावा, ह्या हेतूने काढला नसून इतर भांडवलदार लोकांनी या भागात येऊन, साखर कारखाने काढून आम्ही त्यांचे मजूर न बनता आपणच असे धंदे काढून आपली पिळवणूक थांबवावी अन् शेतीचा धंदा आपल्याच हाती ठेवून आपली उन्नती करून घ्यावी ह्या हेतून काढला आहे…'असे सांगत पद्मश्री विठ्ठलरा विखे पाटलांनी 23 डिसेंबर 1950 रोजी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. आणि राज्याच्या एका सोनेरी पर्वाला सुरूवात झाली.सहकार! सामान्य शेतकर्‍यांनी कष्टाच्या पैशातून पाहिलेले प्रगतीचे स्वप्न. या स्वप्नाला मदतीचा हात दिला तो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी. सहकाराला साथ देणारे सरकारी धोरण त्यांनी तयार केले. मग अवघी पिढीच सहकाराने भारावून गेली.आधी साखर कारखाने उभे राहिले. ते यशस्वीपणे चालू शकतात हे लक्षात येताच दूधसंघ निघाले. एकीकडे महाराष्ट्रात हरीत क्रांती होत होती. तेंव्हाच श्वेतक्रांतीची हाकही सह्याद्रीच्या दरीखोर्‍यात घुमली. दुचाकीला किटल्या लावून महाराष्ट्र सकाळी सकाळी सोसायटीत जाताना दिसू लागला. यातूनच सहकाराचा आजचा वटवृक्ष उभा राहीला.आत्तापर्यंत राज्यात एकूण 202 सहकारी साखर कारखान्यांची नोंद झाली. यावर्षी त्यातील 110 कारखान्यांनी गाळप केले आहे. राज्यात नोंदणी केलेले 26 हजार दूधसंघ आहेत. त्यापैकी 16 हजार दूधसंघ सुरू आहेत. सहकारामुळे ग्रामीण महाराष्ट्रात विकासाचे वारे वाहतील हे यशवंतरावांनी ओळखले होते. पण त्याच वेळेला या संस्थांच्या जीवावर राज्यातील सत्ताकारणही रंगत गेले. यशवंतरावांच्या पिढीच्या नैतिकतेचा धाक इतका मोठा होता, की त्यावेळी सत्तेच्या हव्यासापोटी संस्थेच्या पैशाची धूळ केली जात नव्हती. पण यशवंतरावांनंतर मात्र सहकारी संस्थांच्या जीवावर केले जाणारे नात्यागोत्याचे राजकारणही या राज्यात बघायला मिळाले.आज अनेक साखर कारखाने आजारी अवस्थेत चालवावे लागत आहेत. काही सरकारच्या अनुदानावरच चालत आहेत. का झाले असे? ज्यांच्या ताब्यात या संस्था गेल्या ते हात भ्रष्ट झाले. मग संस्थाही पोखरल्या गेल्या. सहकाराचे हे भ्रष्ट रूप प्रकर्षाने समोर आले ते पतसंस्थांच्या बेसुमार वाढीनंतर. राज्यात आज 16 हजार 300 पतसंस्था आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 462 संस्था बुडाल्या आहेत. राज्यभरात 1400 कोटी रूपयांपर्यंत लोकांचे पैसे या पतसंस्थांनी बुडवलेत. सहकारातून अनेक बलाढ्य नेते तयार झाले. राज्यातील मानाची मंत्रीपदे साखर सम्राट, दूध सम्राटांनी मिळवली. शरद पवारांनी याच सहकाराच्या पायावर दिल्लीच्या तख्ताचे स्वप्न बघितले. सहकाराचे राजकारण इथेच संपले नाही.राजकारणातली घराणेशाही सहकाराच्या आडोशाने बलदंड झाली. चित्र लांबून सुंदर दिसले तरी आता त्यातील काही रंग उडालेत. सहकार चळवळीपुढे कधी नव्हे इतके प्रश्न उभे आहेत. शेतमालाला हमीभाव देताना मालाच्या वितरणाची मोठी जबाबदारी अंगावर येऊन पडलीये. आणि भ्रष्टाचाराचा रोग तर अवघी चळवळच गिळून टाकतो की काय अशी परिस्थिती आहे.एक सावकार शेतकर्‍याला नडतो म्हणून पद्मश्री विखे पाटलांनी सहकाराचा मार्ग स्वीकारला. आता या सहकारातूनच निर्माण झालेल्या सावकारांच्या तावडीतून लोकांची सुटका होण्याची खरी गरज आहे.

close