नक्षलवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई नाही

April 7, 2010 8:47 AM0 commentsViews: 3

7एप्रिलछत्तीसगडमधील नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करण्याचा विचार नाही, असे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. जगदलपूर इथे पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारे लष्करी किंवा हवाई हल्ल्याची योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही बोलणी करण्याची तयारी दाखवली, पण नक्षलवाद्यांनी हल्ल्याने प्रत्युत्तर दिले, असेही गृहमंत्री म्हणाले. त्याचबरोबर हे ऑपरेशन ग्रीन हंट नव्हते, तर निमलष्करी दलाने राज्य पोलिसांच्या मदतीने नक्षलवाद्यांच्या हिंसक घटना थांबवण्यासाठी उचललेले हे पाऊल होते. पण त्यात अपयश आले, असेही गृहमंत्री म्हणाले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 76 जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिदंबरम जगदलपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जगदलपूरमध्ये भावपूर्ण वातावरणात दंतेवाडाच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 76 CRPFच्या जवानांना चिदंबरम यांनी अखेरची सलामी दिली. दंतेवाडाच्या घटनेनंतरही नक्षलवाद्यांविरुद्ध लष्कर उतरवणार नाही, या भूमिकेवर सरकार ठाम आहे. पण हवाई दलाचा वापर करण्याबद्दल पुनर्विचार होऊ शकतो, असे संकेत सरकारने दिले आहेत.नक्षवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहीमेची तीव्रता वाढवण्याची गरज नाही, असेही चिदंबरम यांचे म्हणणे आहे. नक्षलवाद्यांचा म्होरक्या गणेश व्ही. के. गणेशचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. दंतेवाडाच्या नक्षली हल्ल्याचा हा मास्टर माईंड आहे. काही दिवसांपूर्वी गणेशने सरकारला खुलेआम आव्हान दिले होते.कालच्या नक्षली हल्ल्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.नक्षलविरोधी धोरणाचा पुनविर्चार करण्याची वेळ आलेली नाही, नक्षलविरोधी मोहिमेत हवाई दलाच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हवाई दलाच्या मदतीचे संकेत दिले आहेत. पण नक्षलवाद्यांविरोधात एअर फोर्सची वापर करण्यास हवाईदल प्रमुखांनी विरोध दर्शवला आहे.

close