पंकजांच्या नाराजीमुळे राम शिंदेंनी पदभार स्विकारलाच नाही!

July 12, 2016 9:22 PM0 commentsViews:

asdsasday

12  जुलै : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरचं नाराजीनाट्य आणि संघर्ष अद्याप कायम असल्याचं दिसतंय. राम शिंदे यांनी अद्याप जलसंधारण विभागाचा पदभारच स्वीकारलेला नाही. पंकजा मुंडे यांची नाराजी टाळण्यासाठी, राम शिंदे यांनी पदभार स्वीकारलेला नाही, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. राम शिंदे हे पंकजा मुंडे परदेशातून आल्यानंतरच त्यांच्याशी सल्लामसलत करून पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादात आपला बळी न जावा, यासाठी राम शिंदे यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, राम शिंदे यांचा मुक्काम सध्या जामखेड या त्यांच्या मतदारसंघात आहे. येत्या दोन दिवसांत ते मुंबईत परतणार आहेत. त्यानंतरच त्यांची याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांची गृहराज्य मंत्रीपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंकडून काढून घेण्यात आलेलं जलसंधारण खातं देण्यात आलं. हे खातं काढून घेतल्यामुळे पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा