स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री पाडताय ओबीसी नेत्यांमध्ये फूट ?

July 13, 2016 10:54 PM0 commentsViews:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई – 13 जुलै : एकेकाळी महाराष्ट्रात मराठाविरूद्ध ओबीसी असं राजकारणाचे पट पडायचे. आताही पडतात. पण भाजपाचं सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून ओबीसी नेत्यांमध्येच टक्कर लागल्याचं दिसतंय. त्यातही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केलेत. याबद्दलचा हा रिपोर्ट

महादेव जानकर आणि राम शिंदे… कदाचित ही महाराष्ट्रातली पहिली वेळ होती की धनगर समाजातले दोन टॉपचे नेते एकाच वेळेस कॅबिनेटपदाची शपथ घेतायत. पैशानं गब्बर असलेला पण मेंढ्या सांभाळीत भटकंती करणारा हा धनगर समाज सत्तेत पाहून महाराष्ट्रही खुश झाला. पण राजकारण दिसतं तेवढं सरळ थोडंच असतं. कहाणीत ट्विस्ट आणला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.

pankaja_cm_fadanvisदोन दिवसांच्या दमछाकीनंतर मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केलं आणि त्यात ओबीसी नेत्यांमध्ये टक्कर लावण्याचा प्रयत्न केला. कारण ओबीसीच्या नेत्या म्हणून समोर आलेल्या पंकजा मुंडेंचं जलसंधारण काढून मुख्यमंत्र्यांनी दुसरे ओबीसी नेते असलेल्या राम शिंदेंना ते खातं दिलं. परिणामी पंकजा नाराज झाल्या आणि त्यांची नाराजी राम शिंदेंना परवडणारी नाही.

सीएमनी खातेवाटप केलं आणि विदेश दौर्‍यावर निघून गेले. त्याच वेळेस पंकजाही सिंगापूर दौर्‍यावर होत्या. त्यांना कदाचित विमानातच कळालं की त्यांचं खातं काढून राम शिंदेंना दिलंय. त्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरच उत्तर दिलं. पंकजा आणि मुख्यमंत्र्यांच्या ह्या राजकारणात गोची झाली ती राम शिंदेंची. कारण त्यांना कॅबिनेटपद फडणवीसांनी दिलं खरं पण ह्या पदापर्यंत ते पोहोचलेत ते गोपीनाथ मुंडेंच्या पाठबळावर. राम शिंदेंनी पदभार स्वीकारलेला नाही. कारण त्यांना पंकजाची नाराजी परवडणारी नाही.

राम शिंदे हे अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज. चौंडी हे आता धनगरांचं श्रद्दास्थान झालंय. गोपीनाथ मुंडे जसे भगवानगडला जायचे तसे ते चौंडीलाही जायचे. तोच कित्ता आता पंकजा मुंडे गिरवतात. कारण आहे धनगरांची राजकीय ताकद. राम शिंदे मंत्रीपदापर्यंत पोहोचलेत ते ह्याच ताकदीच्या बळावर. पंकजा मुंडे, महादेव जानकर, राम शिंदे ही ओबीसींची फळी स्ट्राँग होतेय असं दिसताच फडणवीसांनी त्यात फुट पाडण्यासाठीच शिंदेंना कॅबिनेट मंत्री करून पंकजाचं खातं दिल्याची चर्चा आहे.

राम शिंदेंनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही त्याचं कारण पंकजा-महादेव जानकर ह्या जोडगळीची भीती. कारण जामखेड-कर्जत ह्या राम शिंदेंच्या मतदारसंघात धनगरांची संख्या लक्षणीय आहे. त्यातही राम शिंदे हे धनगरातले खुटेकर आहेत तर महादेव जानकर हे हटकर आहेत. राम शिंदेंच्या मतदारसंघात खुटेकरांची संख्या कमी आहे तर जानकर असलेल्या हाटकरांची अधिक. बरं राम शिंदे इथपर्यंत पोहचलेत ते गोपीनाथरावांच्या मदतीनं. त्यामुळेच चांगलं खातं मिळेलही पण पंकजा मुंडे, महादेव जानकर ह्यांची नाराजी ओढवली तर राम शिंदेंना ती परवडणारी नाही. त्यामुळेच राम शिंदेंनी पंकजासोबत संवादाचा मार्ग अवलंबलाय, ज्यानं आता मुख्यमंत्र्यांचीही गोची झाल्याचं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा