सेनेचा पंकजाताईंना सबुरीचा सल्ला, भाजपात ‘राक्षसराज’ टीका

July 14, 2016 2:32 PM0 commentsViews:

मुंबई, 14 जुलै : मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरुन भाजपमध्ये सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षावर शिवसेनेनं ‘सामना’तून आपल्या शैलीत समाचार घेतलाय. पंकजा मुंडेंना सबुरीचा सल्ला देत भाजपला खडेबोल सुनावले. भाजपच्या मंत्र्यांमधील अंतर्गत संघर्ष म्हणजे राक्षसराज असल्याची टीका करण्यात आलीये. भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळतात यावर भाजपमधील कोणताच नेता किंवा आमदार काहीच कसं बोलत नाही असा सवालही उपस्थित करण्यात आलाय.samana_uddhav

शिवसेना आणि भाजपमध्ये पेटलेला सत्तासंघर्ष मंत्रिमंडळ विस्तारानंतर थंडावला. पण, आता भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावर शिवसेनेनं चांगलंच तोंडसुख घेतलं. मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भान ठेवायला हवे. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जत केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल अशी टीका सेनेनं केलीय.

तसंच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांतील हा सुसंवाद फोनवरदेखील साधता आला असता, पण तसे न होता प्रसारमाध्यमांचा जाहीर वापर त्यासाठी झाल्याने लोकांची थोडी करमणूक झाली. पंकजाताई अधूनमधून मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त करीत असतात, पण मुख्यमंत्री कोणी व्हायचे हा निर्णय आताही दिल्लीतूनच घेतला जातो. त्यामुळे पंकजाताईंनी राजकीय चिंतन करून नवे आडाखे बांधायला हवेत असा सल्लाही शिवसेनेनं पंकजा मुंडे यांना दिलाय.

खडसे यांनाही मुख्यमंत्री व्हायचेच होते आणि त्यासाठीच त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडायला लावली. (अशी फुशारकी ते मारतात!) पण आज खडसे घरी आहेत आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहेत असा टोलाही सेनेनं खडसेंना लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा