दाऊद कॉल प्रकरणातून एकनाथ खडसे सुटले

July 18, 2016 6:13 PM0 commentsViews:

18 जुलै : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी खडसेंचं फोनवरून कोणतंही संभाषण झालं नसल्याची माहिती एटीएसने हाटकोर्टात दिलीये. यापूर्वीही गजानन पाटील लाच प्रकरणात खडसेंना एसीबीनं क्लीन चीट दिली होती. त्यामुळे आजच्या एटीएसच्या माहितीमुळे तर खडसेंना आणखीनच दिलासा मिळालाय.

menoon_khadseमाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना अनेक आरोपांमुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यापैकी एक असलेल्या दाऊद कॉल प्रकऱणी आज खडसेंची सुटका झाली. आपच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन आणि हॅकर मनिष भंगाळे यांनी दाऊदच्या फोनवरून खडसेंना फोन आला होता. खडसेंचा नंबर हा दाऊदच्या घरच्या फोनच्या कॉल्समध्ये आहे असा दावा हॅकर मनिष भंगाळेनं केला होता. एवढंच नाहीतर या प्रकरणाची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी मनिष भंगाळेनं हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टात या प्रकरणावर सुनावणी दरम्यान अलीकडे भंगाळेनं खडसेंचा नंबर नसल्याचा यू-टर्न घेतला होता.

या प्रकरणी आज महाराष्ट्र एटीएस पथकाने खडसे आणि दाऊद यांच्यात कोणताही संवाद झाला नाही अशी माहिती सादर केलीये. त्यामुळे खडसेंना मोठा दिलासा मिळालाय. मागील आठवड्यातच खडसेंनी गजानन पाटील लाच प्रकरणातून क्लीन चिट मिळाली होती. आणि आज दाऊद प्रकरणातून सुटका मिळाल्यामुळे खडसेंनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, पिंपरी चिंचवडमधील एमआयडीसी भूखंड प्रकरण अजूनही बाकी आहे. मात्र, खडसेंनी लवकरच मंत्रिमंडळात परतण्याचा दावा केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा