मुंबईत पावसाचे जोरदार कमबॅक, लोकल ‘स्लो ट्रॅक’वर

July 19, 2016 2:12 PM0 commentsViews:

mumbai_rain334419 जुलै : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार कमबॅक केलंय. मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली कांदिवली या भागातही पाऊस आहे. तर पूर्व उपनगरातल्या डोंबिवली, मुलुंड, भांडूप विक्रोळीमध्येही पावसाने धूमशान घातले आहे.
पावसामुळे तिन्ही मार्गावर रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटांच्या उशिराने धावत आहे.

लोकल उशिराने !

पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेलाही फटका बसलाय. कर्जत कसारा आणि कल्याण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावलीये. मध्य रेल्वेच्या लोकल 20 मिनिटं उशिरानं धावतायेत. तर हार्बर रेल्वेचीही वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिरानं धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा वेग मंदावल्यानं मुंबईकरांना आज ऑफिसध्ये पोहचण्यास उशीर होतोय.

कल्याण डोंबिवली परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे डोंबिवलीतल्या सखल भागात पाणी साचलंय. पावसाची संततधार सुरू असल्यानं डोंबिवलीतल्या रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसत नाही.

ठाण्यात काल रात्रीपासून सुरू असलेली रिपरिप अजूनही कायम आहे. पावसामुळे शहरातल्या सखलभागात पाणी साचलंय. सलग पडणार्‍या पावसामुळे ठाण्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय. महाराष्ट्र विद्यालय, चरई आणि वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी साचलं होतं. तर विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्‌ड्यात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती.

तुळशी तलाव ओव्हर फ्लो

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव ओव्हर फ्लो झालाय. तुळशी तलावाची क्षमता 8 हजार दशलक्ष लीटर एवढी आहे. आज सकाळी हा तुळशी तलाव भरुन वाहू लागलाय. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळs तुळशी तलाव भरुन वाहू लागलाय. तुळशी तलावातून पाणीपुरवठ्यासाठी फार थोडं पाणी उचललं जातं. तुळशी
तलावाप्रमाणं भातसा आणि तानसा या तलावक्षेत्रांत दमदार पाऊस होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा