ऐश्वर्य हा माझा मुलगा नाही, जयदेव ठाकरेंचा गौप्यस्फोट ?

July 20, 2016 6:48 PM0 commentsViews:

jaidev_thackery20 जुलै : ठाकरे विरूद्ध ठाकरे न्यायालयीन लढाईत जयदेव ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. ऐश्वर्य हा माझा मुलगा नसल्याचा खुलासाच जयदेव ठाकरेंनी सुनावणीदरम्यान केलाय. जयदेव ठाकरेंच्या या विधानानंतर कोर्टानेच तात्काळ सुनावणी थांबवली आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही कोर्टरुमच्या बाहेर काढण्यात आलं. आणि पुढची सुनावणी इनकॅमेरा सुरू झाली.

कोर्टाच्या उलटतपासणी दरम्यान जयदेव ठाकरे यांना नवीन मातोश्री बंगल्याचा जो पहिला मजला देण्यात आला होता. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले. 2004 साली स्मिता ठाकरे यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर तुम्ही मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर गेला होता का ?, रात्री थांबला होतात का ?, अशी विचारणा झाल्यानंतर जयदेव ठाकरे यांनी मला नेमक्या तारखा आठवत नाहीत असं उत्तर दिलं.

त्यानंतर तुम्हाला पहिल्या मजल्या राहण्यापासून कोणी मज्जाव केला होता का ? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी तो मजला बहुतेक वेळा बंद असायचा किंवा त्याला कुलूप असायचं असं त्यांनी सांगितलं. त्यासोबतच काहीवेळा कोणीतरी इतरही तिथं असायचं असंही जयदेव ठाकरे यांनी सांगितलं. संबंधीत व्यक्तीबद्दल बाळासाहेबांकडे विचारणा केली असता त्यांनी मला तिथं ऐश्वर्य राहतो असं सांगितलं.

त्यावर उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी जयदेव ठाकरेंना प्रश्न विचारला की हा तुमचा मुलगा आहे का ? त्यावर जयदेव ठाकरे यांनी असं म्हटलं की हा मुद्दा मला रेकॉर्डवर आणायचा होता. ऐश्वर्य हा माझा मुलगा नसल्याचा खुलासाच जयदेव ठाकरेंनी केलाय. त्यामुळे ठाकरें बंधूंमधला संपत्तीचा हा वाद कोणत्या थराला पोहोचलाय हे सहज स्पष्ट होतंय. जयदेव ठाकरेंच्या या विधानामुळे नक्कीच मोठी खळबळ होण्याची शक्यता आहे.

कोर्टात काय संभाषण झालं ?

उद्धव ठाकरेंचे वकील- 2004 साली स्मितासोबत घटस्फोट झाल्यानंतर मातोश्रीमध्ये कुटुंबासह जाण्याचा निर्णय घेतला का?
जयदेव ठाकरे- नाही

उद्धव ठाकरेंचे वकील- 2004 नंतर पहिल्या मजल्यावर कधी रात्री मुक्काम केला होता का ?
जयदेव ठाकरे- मला नेमक्या तारखा आठवत नाहीत

उद्धव ठाकरेंचे वकील – तुम्हाला मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यापासून कोणी रोखलं होतं का ?
जयदेव ठाकरे – तो मजला बहुतेक वेळा बंद असे. किंवा त्याला कुलूप घातलेलं असे…आणि काहीवेळा इतर कोणीतरी तिकडे राहत असे….

उद्धव ठाकरेंचे वकील- मग तुम्ही यासंदर्भात कोणाकडे चौकशी केली नाही का? कोण आहे ती व्यक्ती?
जयदेव ठाकरे – होय मी, बाळासाहेबांकडे हा विषय बोललो होतो.

उद्धव ठाकरेंचे वकील – मग त्यांनी काय सांगितले ?
जयदेव ठाकरे – बाळासाहेबांनी मला असं सांगितलं की., ऐश्वर्य म्हणून कोणीतरी तिकडे राहतं

उद्धव ठाकरेंचे वकील- ऐश्वर्य तुमचा मुलगा आहे का ?
जयदेव ठाकरे- बरं झालं, हा मुद्दा मला बर्‍याच दिवसांपासून रेकॉर्डवर आणायचाच होता

न्यायाधीश – (मध्येच थांबवत) ते आपण सगळं 3 वाजल्यानंतर बोलूयात….
न्यायाधीश – ऐश्वर्य, हा तुमचा मुलगा आहे की नाही ? हो की नाही एवढंच उत्तर द्या
जयदेव ठाकरे: नाही
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close