सांगा #मीशेतकरीझालोतर…

July 21, 2016 8:37 PM0 commentsViews:

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

‘ऍग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया’ म्हणजे शेती ही भारताची संस्कृती आहे, असे म्हटले जाते. पूर्वी ती वस्तुस्थिती होती, आता ती स्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. दोनशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असणारी ग्रामस्वराज्याची व्यवस्था मोडून काढली होती. तरीही पन्नास-साठ वर्षांपर्यंत उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असेच मानले जात असे. मात्र आज 21व्या शतकात उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती अशी स्थिती झाली आहे. कारण आमच्या कृषी आधारित लोकजीवनाला शेतीचे अर्थकारण सांभाळता आले नाही. परिणामी दिवसेंदिवस शेती आणि शेतकरी यांची स्थिती दयनीय होत गेली. त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. 1995 ते 2015 या काळात देशभरात 3 लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे दर अर्धा तासाने एक शेतकरी मरण जवळ करतो. त्यावर ना कुणाला खेद ना खंत. सत्तारूढ नेते असो वा मोठे विचारवंत, सगळ्यांना ठाऊक आहे की शेती करणे हा सध्या हातभट्ट्याचा व्यवहार बनला आहे. पण शेती हा उपजीविकेचा फक्त उद्योग-व्यवसाय नसून, गाव-खेड्यात विखुरलेल्या 70-80 कोटी भारतीयांचा जीवनमार्ग आहे, हे मानायला कुणी तयार नाही.mishetkarijhalotar

शेती हा पैसा कमावण्यासोबत संस्कृती संचयाचे साधन आहे, यावर विश्वास ठेवायला कुणी तयार नाही. त्यामुळे 1991 नंतर आलेल्या ‘खाउजा’च्या (खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) लाटेत शेती व शेतकर्‍यांचा टिकाव लागला नाही. परिणामी समाजाच्या सर्वच स्तरांवरून शेती व शेतकर्‍याची प्रतिष्ठा कमी होत गेली. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आमचे सण-उत्सव सारे शेतीच्या वेळापत्रकानुसार ठरायचे. शेतीतील उत्पन्नावर अलुते-बलुतेदारासह सार्‍या गावकीचे पोट भरायचे. त्यामुळे बोली भाषेतील शब्द, म्हणी, गाणी, लोकनाट्य, रूढी-परंपरा या सार्‍यावर शेतीचाच प्रभाव असे. पण गेल्या तिसेक वर्षांत हे सगळं कमी होत गेले. आमच्या कथा, कादंबर्‍या, कविता, लोकगीते, नाटक वा सिनेमा या सगळ्याच शेती पार्श्वभूमीला तर शेतकरी नायक म्हणून दिसायचा, पण आताशा तेही थांबलेले आहे. वाढत्या शहरीकरणाने आधुनिक संस्कृती, राहणीमान टीव्ही-सिनेमा-इंटरनेटच्या माध्यमातून शेतकर्‍याच्या अंगणात टाकलेली आहे. त्यामुळे आता शेतकर्‍याच्या मुलालाही शहरं खुणावताहेत. मुलींना शेतकरी नवरा नकोय. एकूणच काय तर शेतकर्‍याच्या घरातूनच शेती काढून टाकण्याची प्रक्रिया पद्धतशीरपणे सुरू आहे.

लोकसंख्येच्या अमाप वाढीबरोबर नागरीकरण-औद्योगिकीकरण झाल्याने शेतीच्या भूक्षेत्राचे प्रमाण कमी होत आहे. तुम्ही कोणत्याही नव्याने विकसित होणार्‍या गावात जा, तेथे ओसाड शेतजमिनींवर एनए प्लॉट उपलब्ध असे फलक उगवलेले दिसतील. बर्‍याच ठिकाणी चाळी, बंगले, इमारती आणि तत्सम प्रकल्पांनी शेतीचा घास घेतलेला आहे. हे असेच आणखी काही काळ सुरू राहिले तर? आज अन्नदाता बळीराजा शेती कसतो, म्हणून आम जनतेचे जगणे सुलभ होते; पण सावकारी कर्ज अस्मानी-सुलतानीच्या टाचेखाली हा बळीराजाच जर बळी गेला तर शेतीची माती होईल… मग उंच टॉवरमध्ये, आलिशान बंगल्यात बसून तुम्ही-आम्ही काय खाणार?

या वस्तुस्थितीचा आज गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी शेतकर्‍यांच्या भूमिकेत गेले पाहिजे…संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा? जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे! थोडक्यात काय तर शेतकर्‍यांचे जीवन, प्रश्न समजून घेण्यासाठी आम्हाला त्या ‘भूमिकेत’ जाऊन विचार करावा लागेल. आम्ही आयबीएन लोकमतच्या माध्यमातून तसा प्रयत्न करतोय. शेतीशी संबंधित सगळ्या विषयांचा नव्याने धांडोळा घेत आहोत , ‘जागर बळीराजाचा’ या येत्या 15 ऑगस्टपर्यंत चालणार्‍या वृत्तमालिकेत आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत महाराष्ट्रातील शेतीचे वास्तव… राज्याच्या कानाकोपर्‍यातील बळीराजापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि त्याचे सारी सुख-दुःखे तुमच्यासोबत वाटून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत… मग विचार काय करता, चला आमच्यासोबत, या आणि व्यक्त व्हा, तुमचे मन मोकळे करा… सांगा #मीशेतकरीझालोतर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close