अॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार व्हावा, राज ठाकरेंची मागणी

July 25, 2016 7:45 PM0 commentsViews:

पुणे, 25 जुलै : ऍट्रॉसिटी कायदाचा आज गैरवापर होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे कोणत्याही समाजानुसार कायदे नसावे. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये. बलात्कार सारख्या प्रकरणात दोषींना तिथल्या तिथे शिक्षा व्हावी असा शरियत सारखा कायदा करावा अशीही मागणीही राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही खाते नसावे त्यांनी फक्त इतर खात्यांवर देखरेख ठेवावी असा सल्लावजा टोलाही राज यांनी लगावला. ते पुण्यात बोलत होते.raj_thackery_new

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोपर्डी इथं जाऊन ‘निर्भया’च्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. कोपर्डीचा दौरा आटोपून राज ठाकरे पुण्यात पोहोचले होते. तिथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कोपर्डीत घडलेली घटना ही मन सुन्न करणार आहे. या प्रकरणातील नराधमांचे हातपाय छाटले पाहिजे. पुन्हा कधी कुणाची अशी हिंमत होणार नाही असे शरियत सारखे कायदे आपल्याकडे केले पाहिजे. बलात्कारासारख्या घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कायदा हवा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

‘ऍट्रॉसिटीचा पुनर्विचार करा’

तसंच कोपर्डीतल्या गावकर्‍यांना जेव्हा भेटलो तेव्हा ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचं त्यांचं म्हणणंय. आणि ते खरंही आहे. आज ऍट्रॉसिटी कायदाचा गैरवापर होत आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना जामीन सुद्धा मिळत नाही. त्यामुळे ऍट्रॉसिटीचा पुनर्विचार करणं गरजेचं असून त्यात सुधारणा आवश्यक आहे. ऍट्रॉसिटीला पर्याय हवा का? याचाही विचार झाला पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

‘सत्ता बदलण्याचा कोणताही परिणाम नाही’
 
सत्ता बदलल्याची कोणतीही लक्षण दिसतं. नाहीत, ते गेले आणि तुम्ही आलात काय फरक पडलाय. मुळात राज्यात कुणाला कायद्याची भीती उरलेली नाही. अलीकडे एका बलात्कार प्रकरणातून सुटलेल्या आरोपीने पुन्हा एकदा त्याच तरुणीवर अत्याचार केला. काय चाललंय काय ?, कायद्याचा काही धाक आहे की नाही ?, काश्मीरमध्ये पोलिसांच्या गाडीवर दगडफेक होते आणि पोलीस काही करत नाही, हे काय सरकार बदलण्याचे लक्षण आहे का ? काश्मिरमध्येही यांचं सरकार, केंद्रातही यांचं सरकार मग बदल कुठे घडला का ? जे आजपर्यंत सुरू होतं ते चाललंय अशी टीका राज ठाकरे यांनी भाजपवर केली.

‘मुख्यमंत्र्यांकडे कोणतंही खात नसावं’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणता, मी सक्षम आहे. बरं तुम्ही सक्षम आहे ते बघूच. मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणता, दोषींना फासापर्यंत पोहोचवू, हे काय मुख्यमंत्र्यांचं काम आहे का ? कसले ही आश्वासनं देताय. मुळात मुख्यमंत्र्यांकडे कोणतंही खातं नसावं. मुख्यमंत्र्यांनी फक्त इतर खात्यांचा कामकाज कसा चाललाय याची देखरेख ठेवली पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
तसंच रामदास आठवलेंना विमातळावर अडवून त्यांनी आठवलेंना मुर्ख बनवलं. आणि दुसर्‍याच दिवशी खुद्द मुख्यमंत्री तिथे गेले याला काय म्हणायचं असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close