स्पेशल रिपोर्ट : शिवसेना-भाजपचं ‘युतीस खेळ चाले’ !

July 27, 2016 5:10 PM1 commentViews:

27 जुलै : सत्तेत भाजपच्या सोबत असलेली सेना बाहेर मात्र विरोधकाच्या भूमिकेत आहे. मित्र आणि शत्रूचं हे दोन्ही पक्षांतलं नातं नेहमीच महाराष्ट्राला पाहायला मिळतं. सत्तेच्या या साठमारीत महाराष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट…

शिवसेना आणि भाजपमधल्या भांडणाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. राज्यात आणि केंद्रात सत्तेत मांडीला मांडी लावून बसणार्‍या या दोन पक्षांचा तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना हा नेहमीचाच खेळ पुन्हा सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मातोश्री’वर जेवणाच्या पंक्तीसाठी बोलावणारे उद्धव ठाकरे आता फडणवीस सरकार सत्तेचा वापर करून सेनेची कोंडी करत असल्याचं बोलू लागले आहेत. त्यांच्या रागाचा पारा इतका इतकावर गेलाय की, गेल्या पंचवीस वर्षांत शिवसेना युतीमध्ये सडली असा गंभीर आरोप करून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीये. त्यातही सेनेने विधानसभेत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची भाषा करणे ही बाब त्यांचा हा राग किती दिवस, खरेतर किती तास टिकणार हा मोठा प्रश्न आहे. यावर टीका करण्याची संधी विरोधी पक्षही सोडत नाहीयेत.uddhav_cm_selfy_new_image

अर्थात सेना-भाजपधले हे वाद आजचे नाहीत. त्याला 1995 साली सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या कुरबुरींचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे सक्रिय असेपर्यंत भाजप जास्त आक्रमक नव्हता. पण बाळासाहेबांचं निधन झालं आणि सारी समीकरणं बदलली.
विशेषतः नरेंद्र मोदी यांचा दिल्लीच्या राजकीय क्षितिजावर उदय झाल्यानंतर भाजप-सेनेतले संबंध बिघडत गेले. दिल्लीच्या सत्तेत पुरेसं महत्त्व मिळालं नसल्यानं युतीमधून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेनं दिला होता. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम्ही सेनेसोबत युती करणार नाही अशी घोषणा भाजपने केली आणि सेनेला एकाकी पाडलं.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपाविरोधातच रान उठवलं.सेना-भाजपसाठी विधानसभा निवडणूक म्हणजे जणू इतिहासकालीन युद्धच बनलं होतं.

पण विधानसभा निवडणुकीत तब्बल 122 जागा पटकावून भाजप राज्यात मोठा भाऊ बनला. 63 जागा मिळवणार्‍या शिवसेनेला सोबत न घेता देवेंद्र फडणवीस यांनी जंगी सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 25 वर्षांची युती जवळ-जवळ संपली होती. पण अवघ्या दोन महिन्यात उद्धव ठाकरे तडजोडीला तयार झाले. आणि महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसलेल्या शिवसेनेनं तुलेलनं कमी महत्त्वाच्या खात्यांवर समाधान मानलं. पण संघर्षाचा सिलसिला मात्र सुरूच राहिला. कधी पाकिस्तानी गझल गायक तर कधी सुधींद्र कुलकर्णी निमित्त ठरले..एकमेकांना साप, बेडूक, अशी प्राण्यांची उपमा देता देता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हिंदी सिनेमातील खलनायक आणि विनोदी पात्रांचाही पुरेपूर वापर केला.

पण मुंबई-ठाणे आदी महापालिकां पासून, राज्य आणि केंद्रात एकत्रित सत्ता गाजविणार्‍या या दोन पक्षांमधलं हे भांडण खरं आहे का? असाही प्रश्न पडतो. एकीकडे टीका करायची दुसरीकडे सोबत येऊन वृक्षारोपण करायचं, एकमेकांच्या घरी पंगती झोडायच्या आणि लोकांसमोर म्हणायचं आम्हाला सत्तेत रस नाही..

शेतकरी दररोज मरतोय, महागाई वाढतेय, रस्त्यांवरचे खड्डे तसेच आहेत, तरुणांना रोजगार नाही, महिलांवर अत्याचार वाढतायत, भ्रष्टाचार थांबलेला नाही, अशा सर्वच बाजूंनी राज्यातली जनता पिळली जातेय. पण मोठ्या विश्वासानं ज्यांच्याकडे सत्ता सोपवली त्या
शिवसेना-भाजपला इकडे लक्ष द्यायला वेळीच नाही. सत्ता नको म्हणत सत्तेच्या गुळाला चिकटून आहेत. कल्याण-डोंबिवलीत आधी भांंडून नंतर सत्तेसाठी जसं एकत्र आले, कदाचित तसंच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असावं..तोच खेळ उद्या पुन्हा..उद्या पुन्हा तोच खेळ…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • VINOD

    Phar Hasu Yet aahe shabdach naahi aahet……

close