आशिष शेलारांकडून भुजबळांसारखा गैरव्यवहार, ‘आप’चा आरोप

July 27, 2016 8:12 PM0 commentsViews:

27 जुलै : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आम आदमी पक्षाने आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलारांनी रिद्धी आणि सर्वेश्वर या दोन कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची अफरातफर केल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय. कलकत्ता पॅटर्न टाईपचा हा घोटाळा असल्याने या सर्व गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी प्रीती शर्मा यांनी केलीय.aap_vs_shelar

आशिष शेलारांच्या या कंपन्या काहीच करत नाहीत तरीही या कंपन्यांचे शेअर मात्र चढ्या किंमतीने विकले जातात. तसंच प्रकाश पाटील आणि सुनील परब हे शेलारांचे पीए असलेले दोघेजण नंतर हे या कंपन्यांचे संचालक बनले. त्यामुळे हे नेमकं काय गौडबंगाल आहे याचीही एसीबीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी शर्मा यांनी केलीय. तसंच छगन भुजबळ यांच्या बाबतीत जे झालं होतं तेच आशिष शेलार यांच्या बाबतीत झालं. आशिष शेलारांच्या कंपनीमध्ये सुरुवातीला काहीचं नव्हतं. नंतर त्यांना 6 कोटींचं लोन मिळालं. एवढंच नाहीतर आशिष शेलार यांनी यांच्या एका कंपनीबाबत निवडणूक आयोगाला कोणतीही माहिती दिली नाही असा आरोपही मेनन यांनी केला.

दरम्यान, शेलारांनी प्रीती शर्मा यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. या कंपन्यामध्ये माझी फक्त 45 लाखांची गुंतवणूक होती आणि आतातर मी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा देखील दिला आहे, असा खुलासा शेलारांनी केलाय. तसंच नाहक बदनामी केल्याबद्दल अब्रुनुकसान भरपाईचा दावाही दाखल करणार असल्याचं शेलारांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close