कोल्हापूरमध्ये हद्दवाढीच्या समर्थनार्थ कडकडीत बंद, रिक्षांची तोडफोड

July 28, 2016 12:55 PM0 commentsViews:

Kolhapur band1

पुणे  – 28 जुलै : कोल्हापूरमध्ये हद्दवाढ मागणीच्या समर्थनार्थ आज (गुरुवारी) पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय ‘बंद’ला हिंसक वळण लागलं आहे. बंदच्या समर्थकांनी एसटी डेपो परिसरात दोन बसेसवर दगडफेक केली आहे. तर दोन रिक्षांचीही तोडफोड करण्यात आली आहे. तर या बंदमुळे जनजीवनावरही परिणाम झाला आहे. तसंच जिल्ह्याचे राजकारण आणि समाजकारणही ढवळून निघलं आहे.

कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालये आणि इतर सर्व व्यवहार ठप्प बंद करण्यात आले आहेत. रिक्षा आणि केएमटी बसनेही या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. शिवाजी चौकात हद्दवाढ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या नजीक असलेली 18 गावे पालिका हद्दीत आणण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पण त्याला या 18 गावांचा विरोध आहे. हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांनीही स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आजचा सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, हद्दवाढीच्या विरोधात काल (बुधवारी) या 18 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर गुरुवारी हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापूर शहरात बंद पुकारण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या हद्दवाढीचा वाद काय?

– महापालिकेच्या हद्दवाढीत 18 गावांचा समावेश
– महापालिकेत यायला 18 गावांचा विरोध
– मुख्यमंत्र्यांचं गावांना झुकतं माप, हद्दवाढीला स्थगिती
– मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात शहरवासीयांचा बंद
– हद्दवाढीसंदर्भात सोमवारी मुंबईत बैठक
– मुख्यमंत्रीही राहणार बैठकीला उपस्थित

महापालिकेत कोणत्या 18 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे ?

– सरनोबतवाडी, गडमुडशिंगी, गोकुळ शिरगाव, नागाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबा, उचगाव, आंबेवाडी, वाडीपीर, वडनगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी, वळीवडे, गांधीनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close