आदित्य ठाकरेंच्या बालहट्टापायी पेंग्विनचा खर्च पालिकेनं का उचलायचा ?,विरोधकांचा सवाल

July 28, 2016 4:59 PM0 commentsViews:

28 जुलै : मुंबईच्या राणीच्या बागेत आणलेल्या पेंग्विनवरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टापायी पेंग्विनचा खर्च पालिकेनं का उचलायचा ? असा सवाल विरोधकांनी उपस्थिती केला. काँग्रेसचे नेते नितेश राणे यांच्यासह मनसेनंही याला कडाडून विरोध केलाय.

rane_vs_aditya3तब्बल 14 ते 15 कोटी खर्चून अखेर मुंबईत पेंग्विन दाखल झाले आहे. पण, नेहमीप्रमाणे विरोधकांनी या पेंग्विन आगमनावरुन सेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेचे वय पन्नास वर्षे झाले असले तरी त्यांची वर्तवणूक मात्र पाच वर्षांच्या लहान मुलासारखी आहे. नाइटलाइफ आणि ओपन जिमपाठोपाठ आता बालहट्टाचा तिसरा एपिसोड म्हणजे पेंग्विन, अशी बोचरी टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर केलीये. मुंबईच्या वातावरणात पेंग्विन जगतील का? हा खरा प्रश्न असून याबाबत आधी अभ्यास करण्याची गरज होती. मात्र बालहट्टासमोर झुकून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील वातावरणात पेंग्विन जगणे अशक्य असल्याने उद्या त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यानंतर महापौर, नगरसेवक आणि संबंधित पदाधिकार्‍यांना बळीचा बकरा बनवण्यात येईल. पण बालहट्ट करणार्‍यावर कुणीही बोट दाखवणार नाही अशी टीकाही राणेंनी केली. तर कुणाचा तरी बालहट्ट पुरवायचा म्हणून पेंग्विनसाठी कोटींचा खर्च महापालिकेनं का उचलायचा? असा सवाल करत मनसेचे संदीप देशपांडे यांनी केलाय.

पेंग्विन्सच्या देखभालीसाठी नेमलेल्या ऑस्टेलियन एजन्सीला 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे. तसंच पेंग्विनसाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी 7 ते 8 कोटी असा एकूण 14 ते 15 कोटी खर्च होतो आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराclose