महागाईच्या मुद्यावरुन राहुल गांधी-जेटलींमध्ये खडाजंगी

July 28, 2016 9:36 PM0 commentsViews:

नवी दिल्ली, 28 जुलै : डाळींचे भाव आभाळाला भिडले आहेत. तुरीच्या डाळीनं 200 रुपये किलोचा टप्पाही गाठला, इतर डाळीही महागल्या आहेत. लोकसभेमध्ये आज याच महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. निवडणुकीपूर्वी ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशी भाजपची घोषणा होती. त्याचाच आधार घेऊन आता हरहर मोदी अशी घोषणा असल्याचा चिमटा राहुल यांनी काढला.

rahul_vs_jaitlyपंतप्रधान मोदी सर्व मुद्द्यांवर बोलतात, पण महागाईबद्दल मौन पाळतात अशी टीका राहुल यांनी केली. स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया अशा मुद्द्यांवर लोकांना फसवता येतं, पण महागाईच्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक करता येणार नाही, असं राहुल म्हणाले.

या चर्चेला आणि राहुल यांच्या टीकेला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उत्तर दिलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदी असल्यामुळे डाळी महागल्याचा बचाव त्यांनी केला. डाळींचे दर कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, त्याचा पाढाही वाचला.

साखरेचे वाढते दर हाही सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र, साखरेचे दर किलोमागे 1 ते 2 रुपयांनी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं जेटलींनी सांगितलं.

एकंदरीतच या चर्चेदरम्यान, अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी विरुद्ध मोदी सरकार अशी शाब्दिक चकमकच बघायला मिळाली. पण ठोस उपाययोजना मात्र समोर आली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा किती हा प्रश्नच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close