‘जय-वीरू’ला गमावणं न परवडणारं !

July 29, 2016 10:11 PM0 commentsViews:

आरती कुलकर्णी,मुंबई -29 जुलै : आज व्याघ्रदिनाच्या आधी विदर्भातले वाघ बेपत्ता झाल्याच्या दुदैर्वी बातम्या आल्या. फक्त जय आणि वीरूच नाही तर जयचा बछडाही गायब असल्याच्या बातम्या येतायत. वाघांच्या संरक्षणाची जोखीम आपल्यावर असताना अशा ढाण्या वाघांना गमावणं आपल्याला परवडणारं नाही.

नागझिरा अभयारण्याची शान.. जय वाघ. आशियातला सर्वात मोठा वाघ म्हणून त्याचा दबदबा. पण हा वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्याची शिकार झाली का ? नीलगाय किंवा रानडुकरांसाठी लावलेल्या फासामध्ये तो अडकला का ? अशा ना ना शंका वन्यजीवप्रेमींना सतावतायत.jai_veeru

फक्त जयच नाही तर जयसोबतचा वीरू वाघही बेपत्ता झालाय. हे वाघ नागझिरा अभयारण्यालगतच्या संचारमार्गाने उमरेड
कारंडला अभयारण्यात आले होते. इथे त्यांचे फोटो काढण्यासाठी वन्यजीवप्रेंमींची एकच गर्दी व्हायची. पण या अभयारण्याचे खरे हिरो जय आणि वीरूच गायब झालेत.. आणि अभयारण्याची शानच हरपलीय.

विदर्भातल्या व्याघ्रप्रकल्पांमध्ये वाघांना पूर्ण संरक्षण आहे. पण अभयारण्याच्या बाहेर जे कॉरिडॉर्स म्हणजे संचारमार्ग आहेत तिथे वाघांची शिकार होण्याचा मोठा धोका आहे. याआधीही विदर्भात अशा प्रकारे वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्यायत. वाघांच्या अधिवासांवर जंगलतोड, खाणी अशासारख्या कारवायांमुळे गदा येतेय. काही जंगलांमध्ये वाघांसाठी पुरेशी शिकार नसल्याचीही उदाहरणं आहेत. ताडोबा व्याघ्रप्रकल्पासाख्या यशोगाथाही आपल्याला पाहायला मिळतात. पण भारतच नाही तर जगभरात वाघांची प्रजाती धोक्यात आलीय. वाघाच्या आठ प्रजातींपैकी 3 प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्यायत. आणि आता उरलेल्या पाच प्रजाती वाचवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे.

या सगळ्या स्थितीत जय आणि वीरूसारख्या ढाण्या वाघांचं गायब होणं सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. जय आणि वीरू हे रॉयल बेंगॉल टायगर प्रजातीचे वाघ. पण त्यासोबतच सायबेरियन वाघांची संख्या फक्त 300 च्या आसपास उरलीय. चीनमध्ये तर वाघांची बेसुमार शिकार झाली, वाघाच्या अवयवांचा व्यापार झाला. वाघांची पैदास प्राणीसंग्रहायलतच होत राहिली. त्यामुळे इथे 50 चं वाघ अस्तित्वात आहेत.

सुमात्रामध्ये वाघांची संख्या 500 एवढी उरलीय. या तुलनेत भारतावरच वाघांचं रक्षण आमि संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी आहे. भारतात 2600 वाघ उरलेत, असं आकडेवारी सांगते. पण त्यातून जय आणि वीरू वजा झाले तर वाघाची शोले डरकाळी जंगलात कशी घुमणार ?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close