कुठे आहे स्मार्ट गाव ?, दोनवर्षांनंतरही ‘माळीण’ वसलंच नाही !

July 30, 2016 3:32 PM0 commentsViews:

30 जुलै : माळीण दुर्घटनेला आज 2 वर्षं पूर्ण होत आहे. सरकारच्या अनास्थेमुळे पुनर्वसनाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्यात 10 स्मार्ट गावं उभारण्यात येणार आहेत. त्या यादीत माळीणचाही समावेश आहे. पण माळीणची आजची परिस्थिती पाहिली तर स्मार्ट गाव सोडाचं, हे साधं गाव म्हणून पुन्हा उभारण्यात आलेलं नाही.

malin_430 जुलै 2014 या दिवशी हे गाव डोंगरकडा कोसळल्यामुळे मातीखाली दबलं गेलं. गावावर शोककळा पसरली. मदतीचे ओघ सुरू झाली. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन माळीणला तात्पुरतं सावरलं. तेव्हा सरकारनं शब्द दिला होता की वर्षभरात माळीणला उभं केलं जाईल. सरकार बदललं पण अनास्था बदलली नाही. देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी माळीणचं पुनर्वसन होणं अपेक्षित होतं. पण ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही.

मृतांना श्रद्धांजली

माळीणमध्ये आज काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येईल, पण तो सरकारी कोरडेपणानं…या दुर्घटनेत मरण पावलेल्यांचे जिवलग आणि मित्र मंडळी मात्र, अजूनही त्यांच्या आठवणींवर जगत आहेत. मृतांना श्रद्धांजली वाहणारे
फ्लेक्स गावात लावले आहेत. ते पाहून त्यांच्या आठवणी पुन्हा ताज्या होताना दिसत आहेत.

आमडे गावात ‘माळीण’ वसलेच नाही

माळीणच्या पुनर्वसनासाठी आमडे गावातली 8 एकर जागा खरेदी करण्यात आली होती. या जागेचं प्लॉटिंग करून बांधकामाला सुरुवातही झाली. पण कामाची मुदत संपूनही ठेकेदारांनी कामं वेळेत पूर्ण केलेली नाहीत. ठरलेल्या 68 पैकी फक्त 4 ते 5 घरं पूर्ण झाली आहेत. शिवाय यंदाच्या पावसात या ठिकाणी जमिनीला तडे गेले आहेत. डोंगरावरचा राडा रोडा मोठ्या प्रमाणावर खाली घसरून आल्यानं या जागेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

तरुण अजूनही बेकारच !

पुनर्वसनाशिवाय आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. शासनाने दुर्घटनाग्रस्त माळीणच्या बेरोजगार तरुणांना खाजगी आणि आदिवासी विभागात नोकर्‍या देण्याचं आश्वासन दिलं होतं. यातील 100 पेक्षा जास्त तरुणांनी मुलाखतीही दिल्या. त्यातल्या अनेकांना पाठपुरावा करून शासनाकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही. तर काही जणांना ऐनवेळी आता नोकरी मिळणार नाही म्हणून सांगण्यात आलंय. खासगी क्षेत्रात नोकर्‍या मिळालेल्यांना इतका कमी पगार दिला जात होता की त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होणंही शक्य नव्हतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close