योग्यवेळी राज्याचं विभाजन-रावसाहेब दानवे

July 30, 2016 10:10 PM0 commentsViews:

शिर्डी, 30 जुलै : योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्र राज्याचे विभाजन करणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय. तसंच वेगळ्या विदर्भाला भाजपाचा पाठिंबा असून छोटे राज्य केल्यास प्रशासकीय दृष्टीने योग्य असल्याचंही मतही दानवे यांनी व्यक्त केलंय. रावसाहेब दानवे आज शिर्डीत भाजपच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरासाठी आले त्यावेळी ते बोलत होते.danve342

भाजपचे खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा लोकसभेत सादर करणार अशी भूमिका कालच घेतली होती. त्यावरून राज्याच्या विधानसभेत रणकंदन घडलं होतं. शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला होता. आज खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच जाहीरपणे वेगळ्या विदर्भावर भाष्य केलंय.

केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून राज्याचे विभाजन करण्याला भाजपचा विरोध असून शिवसेनेचा विरोध असला तरी योग्य वेळी भाजप महाराष्ट्राचे विभाजन करणार आहे अशी घोषणाच दानवेंनी केली. तसंच वेगळा विदर्भाचा मुद्दा याचा युतीच्या विषयाशी संबंध नसल्याचंही रावसाहेब दानवे यांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता शिवसेना या मुद्यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान शिर्डी साईमंदिरावर नेमलेल्या विश्वस्त मंडळामुळे अनेक वाद समोर आले आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी विश्वस्त मंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत तर शिवसेनाही उपाध्यक्षपद न दिल्याने नाराज आहे. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना स्थानिक आमदार म्हणून विश्वस्त मंडळात स्थान न दिल्याने काँग्रेसचे गावोगावी आंदोलन सुरू आहे. मात्र सध्याचे नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ योग्य असून कोणीही याचे राजकारण न करण्याचा इशारा रावसाहेब दानवे यांनी दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close