वेगळ्या विदर्भाचा राडा भाजप-सेनेचं फिक्सिंग ?

August 1, 2016 10:47 PM0 commentsViews:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई 01 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून आज पुन्हा एकदा विधिमंडळाचं कामकाज वाया गेलं. नाना पटोलेंनी लोकसभेत आणि रावसाहेब दानवेंनी शिर्डीतून पेटवलेला हा विषय सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरच थंडावला. पण या गदारोळात जनतेचे प्रश्न पुन्हा एकदा अडगळीत पडल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे विदर्भावरून जाणिवपूर्वक निर्माण केलेला हा गोंधळ म्हणजे सेना-भाजपातली मॅच फिक्सिंग तर नव्हती ना, या राधाकृष्ण विखेपाटील यांच्या आरोपात बर्‍यापैकी तथ्य वाटतंय.sena_bjp_rada

सोमवारी विधिमंडळाचं कामकाजच मुळी ह्या अशा गोंधळाने सुरू झालं. नाना पटोलेंनी तिकडे लोकसभेत वेगळ्या विदर्भासंबंधीचा अशासकीय प्रस्ताव नुसता दाखल काय केला आणि इकडे विधानसभेत शिवसेनेच्या हाती आयतंच कोलीत मिळालं. सेना आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवरच नाना पटोलेंचा निषेध करत अखंड महाराष्ट्रांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सत्ताधारी शिवसेनाच ही अशी मैदानात उतरली म्हटल्यावर मग राष्ट्रवादीही अखंड महाराष्ट्रासाठी फलकबाजी करू लागली.विधानसभेतच वेगळ्या विदर्भाच्या गदारोळामुळे कामकाज देखील होऊ शकलं नाही.

नारायण राणेंनी तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना वेगळ्या विदर्भाचं समर्थन करायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनाही अखंड महाराष्ट्रासाठी आक्रमक झाल्यामुळे मग सरतेशेवटी सरकारचा असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं निवेदन केलं आणि चंद्रकांत पाटलांनी ते सभागृहाबाहेर वाचून दाखवलं.

सरकारने सध्यातरी वेगळ्या विदर्भाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगून वेळ मारून नेली असली तरी राष्ट्रवादीने मात्र, अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव मांडल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका घेतलीय.

वेगळ्या विदर्भावर सत्ताधारी सेना-भाजपची परस्परविरोधी भूमिका सर्वश्रूत आहे. तरीही या दोन्हीही सत्ताधारी पक्षांकडून जाणिवपूर्वक याच कळीच्या मुद्याला हवा देण्याचा प्रयत्न केला होतो. त्यामुळे केवळ मुख्य मद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी तर वेगळ्या विदर्भाचा खेळ मांडला जात नाहीना अशी शंका घ्यायला बराच वाव आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close